जागतिक थायरॉईड दिन विशेषः जाणून घ्या थायरॉईड नोड्यूल अर्थात थायरॉईड ग्रंथीमधील गाठींची लक्षणे, निदान आणि उपचाराची पद्धती


जागतिक आरोग्य समुदायाकडून मानवी शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे महत्व, या ग्रंथीचे आजार आणि त्यावरील उपचारांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २५ मे रोजी जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक थायरॉईड दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरातील प्रख्यात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. स्नेहा डोंगरदिवे यांचा हा विशेष लेख…


डॉ. स्नेहा डोंगरदिवे
(कान, नाक, घसा तज्ज्ञ)

दरवर्षी २५ मे रोजी जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो. थायरॉईड ग्रंथीचे आरोग्य, तिचे शरिरातील महत्व आणि थायरॉईडच्या आजारांविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने जागतिक थायरॉइड दिन साजरा केला जातो. अनेकदा दुर्लक्षित केली जाणारी थायरॉईड ही शरिराची मुख्य नियामक ग्रंथी आहे. जी तुमच्या ऊर्जेची पातळी आणि वजनापासून ते तुमच्या मनःस्थिती आणि ह्रदयाच्या ठोक्यांपर्यंत सर्व गोष्टींवर प्रभाव टाकते. भारतातील दर दहा व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला आहे. २०२१ च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉईडचे ४.२ कोटी रुग्ण आहेत. थायरॉईड एक समस्या ही आहे की, हा आजार झालेल्या एक तृतीयांश व्यक्तींना त्यांना आजार झाल्याची कल्पनाच नाही. हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. यंदाच्या जागतिक थॉयरॉईड दिनामिनित्त थायरॉईड नोड्यूल म्हणजेच थायरॉईड ग्रंथीमधील गाठींविषयी माहिती जाणून घेऊ या….

थायरॉईड नोड्यूल म्हणजे काय?: थायरॉईड नोड्यूल म्हणजे गळ्याच्या पुढच्या भागात असलेल्या, फुलपाखराच्या आकाराच्या थायरॉईड ग्रंथीमध्ये निर्माण होणाऱ्या गाठी किंवा असामान्य सूज होय.
गाठींचे प्रकारः
या गाठी सिंगल (एकच) किंवा मल्टिपल (एकापेक्षा जास्त) असू शकतात. तसेच त्या घन (Solid) किंवा द्रवाने भरलेल्या (Cystic) असू शकतात.
महत्त्वाची माहितीः
सुमारे ९०% पेक्षा जास्त थायरॉईड नोड्युल्स हे साधे (Benign – कर्करोग नसलेले) असतात आणि ते पूर्णपणे निरुपद्रवी असतात. फक्त काही मोजक्या केसेसमध्ये ते कॅन्सरचे (Malignant) असू शकतात.

मुख्य लक्षणे (Symptoms): बहुतेक रुग्णांमध्ये या गाठी लहान असल्यामुळे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्या केवळ नियमित शारीरिक तपासणीत किंवा सोनोग्राफीमध्ये आढळून येतात. परंतु, गाठ मोठी झाल्यास खालील लक्षणे दिसू शकतातः

  • मानेच्या पुढच्या भागात ढेकूळ, गाठ किंवा सूज दिसणे किंवा हाताला जाणवणे, अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होणे.
  • श्वास घेण्यास अडथळा येणे.
  • आवाजात बदल होणे किंवा आवाज बसणे(Hoarseness).

टीप: जर गाठीमुळे जास्त प्रमाणात थायरॉईड संप्रेरक (हार्मोन) तयार होत असेल, तर अचानक वजन कमी होणे, छातीत धडधडणे, आणि जास्त घाम येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

निदानासाठी आवश्यक चाचण्या (Diagnosis & Tests):  गळ्यात गाठ आढळल्यास घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने खालील चाचण्या कराव्यातः
१) थायरॉईड ब्लड टेस्ट (T3, T4, TSH):  ग्रंथीचे कार्य आणि हार्मोनची पातळी तपासण्यासाठी.
२) गळ्याची सोनोग्राफी (USG Neck): गाठीचा अचूक आकार आणि रचनेचा अंदाज घेण्यासाठी.
३) FNAC (Fine Needle Aspiration Cytology): बारीक सुईद्वारे गाठीतील पेशींचा नमुना घेऊन, गाठ साधी आहे की कॅन्सरची हे तपासण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे.

उपचार पद्धती (Treatment Options): सर्वच थायरॉईड गाठींवर तातडीने ऑपरेशनची गरज नसते. उपचार हे गाठीच्या प्रकारावर अवलंबून असतात.
नियमित निरीक्षण (Active Surveillance): गाठ साधी आणि लहान असल्यास दर ६ ते १२ महिन्यांनी सोनोग्राफी करून गाठीच्या आकारावर लक्ष ठेवले जाते.
औषधोपचारः
हार्मोनची पातळी संतुलित करण्यासाठी योग्य गोळ्या दिल्या जातात.
शस्त्रक्रिया (Surgery): जर गाठ कॅन्सरची असेल, तिचा आकार खूप मोठा असेल, किंवा तिच्यामुळे गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ऑपरेशनचा सल्ला दिला जातो.

अधिक माहिती व तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी संपर्क

डॉ. स्नेहा डोंगरदिवे (कान, नाक, घसा तज्ज्ञ)
जीवक संधिवात आणि ई.एन.टी. क्लिनिक
पत्ता: प्लॉट नं. १२, एन-९ एम-२ रोड, छत्रपती संभाजीनगर
संपर्क क्रमांकः 8483840900

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!