दहा दिवसांतच चौथ्यांदा भाववाढः पेट्रोलच्या दरात २.६१ रुपये आणि डिझेलच्या २.७१ रुपये वाढ, महागाई वाढण्याची भीती


नवी दिल्लीः विधानसभा निवडणुका संपताच सरकारने अवघ्या दहा दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ केली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.६१ रुपये तर डिझेलच्या प्रतिलिटर दरात २.७१ वाढ केली आहे. गेल्या दहा दिवसांतच इंधनाचे दर तब्बल ७ रुपयांनी महागल्यामुळे माल वाहतूक आणि दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोमवारी (२५ मे) सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या प्रतिलिटर दरात २.६१ रुपये तर डिझेलच्या प्रतिलिटर दरात २.७१ रुपये वाढ केली. या भाववाढीमुळे दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९५.२० रुपये प्रतिलिटर झाले आहे. १५ मेपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका सुरू झाली. या दरवाढीच्या मालिकेमुळे १५ मेपासून आजपर्यंत पेट्रोल-डिझेलचे प्रतिलिटर भाव ७.५ रुपयांनी वाढले आहेत.

या दरवाढीमुळे देशातील प्रमुख महानगरांतही पेट्रोल-डिझेलच्या प्रतिलिटर दरात वाढ झाली. कोलकात्यात पेट्रोलचा भाव सर्वाधिक वाढला. तेथे पेट्रोलचा भाव ११३.५१ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचला तर डिझेल ९९.८२ रुपये प्रतिलिटर झाले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल १११.२१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९७.८३ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. चेन्नईत पेट्रोल १०७.७७ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९९.५५ रुपये प्रतिलिटर मिळू लागले आहे.

यापूर्वी शनिवारीही (२३ मे) पेट्रोल-डिझेलच्या प्रतिलिटर किंमतीत अनुक्रमे ८७ पैसे आणि ९१ पैसे वाढ करण्यात आली होती. त्याच दिवशी दिल्लीत सीएनजीच्या भावातही एक रुपया प्रतिकिलो ग्राम वाढवून ८१.०९ रुपये प्रतिकिलोग्राम करण्यात आले होते.

तज्ज्ञांच्या मते, डिझेलच्या दरवाढीचा परिणाम केवळ वाहनचालकांपुरताच मर्यादित राहणार नाही. मालवाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे खाद्य पदार्थ आणि दैनंदिन जीवनातील वापराच्या वस्तूंच्या किंमतीवर दबाव पडू शकतो. मागील काही महिन्यांत दूर आणि ब्रेडसारख्या वस्तूंच्या किंमतीवरही इंधन खर्चाचा परिणाम पहायला मिळालेला आहे.

विशेष म्हणजे ज्या दिवशी भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवण्यात आल्या त्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झालेली दिसून आली आहे. सोमवारी ब्रेंट क्रूडच्या किंमती पाच टक्क्यांनी घसरून १०० डॉलर प्रतिबॅरलच्या खाली आल्या आणि ब्रेंट क्रूड ९८.५९ डॉलर प्रतिबॅरलवर घसरले.

अमेरिका आणि ईराणदरम्यान शांतता करार होणार असल्याच्या बातम्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याचे सांगण्यात येते. परंतु देशांतर्गंत बाजारात या घसरणीचा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर सध्या तरी कोणताही परिणाम दिसून येत नाही.

तेल कंपन्यांनी कमावला १९,४७० कोटींचा नफा

 अमेरिका-ईराण युद्धामुळे मार्चमध्ये जागतिक ईंधन पुरवठा विस्कळित झालेला असतानाही देशांतर्गत किरकोळ इंधन बाजारावर ९० टक्क्यांपेक्षा जास्त नियंत्रण असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या तीन सरकारी तेल कंपन्यांनी जानेवारी ते मार्च २०२६ या तिमाहीत तब्बल १९ हजार ४७० कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला. या नफ्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तब्बल ४०.७४ टक्के वाढ झालेली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!