शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवलीः खा. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांकडे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्षपद!


नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापन दिन आज साजरा केला जात असून या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत पक्षाची भाकरी फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्ष असे नवीन पद निर्माण करण्यात आले असून या नव्या पदावर खा. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पवारांनी केली.

 सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा, महिला, युवक-युवती अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड आणि गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुनिल तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनाही राष्ट्रीय राजकारणातील जबाबदारी देण्यात आली आहे. अन्य नेत्यांवरही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

न्यूजटाऊनचे आधीचे वृत्तः राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच कायम, खा. सुप्रिया सुळेंकडे पक्षाचे कार्याध्यक्षपद?

सुनिल तटकरे यांच्यावर ओडिशा पश्चिम बंगाल आणि राष्ट्रीय समितीची सत्रे, परिषदा आणि निवडणूक आयोगाची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अल्पसंख्याक विभाग या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, कामगार विभाग, एससी, एनटी, ओबीसी विभागाची जबाबदारी असेल. मात्र अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीत अजित पवारांचे नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही साथीदारांवर नव्या जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत आहोत, असे शरद पवार यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जाहीर केले.

मला विश्वास आहे की, ही पूर्ण टीम सर्व सहकाऱ्यांना विश्वास देतील, उत्साह  देतील, लोकांमधील विश्वास वाढवतील आणि देशातील परिवर्तनात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निभावण्यासाठी आपली कामगिरी चोखपणे बजावतील, असे शरद पवार म्हणाले.

काही महिन्यांपूर्वी लोक माझे सांगाती या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र नंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या समितीने राजीनामा फेटाळून लावल्यानंतर पवारांनी हा निर्णय मागे घेतला होता. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तिच्यावर आज शिक्कामोर्तब झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!