औरंगाबाद: असोसिएशन ऑफ इंडियन यूनिर्व्हसिटीज (एआययू) यांच्यावतीने २१ व २२ फेब्रुवारीदरम्यान पश्चिम विभागीय कुलगुरु परिषद’ औरंगाबादेत होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला यजमानपद मिळाले असून चार राज्यातील ६० कुलगरु परिषदेस उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन अभाविपचे माजी महामंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या शिक्षा संस्कृती न्यासाचे सचिव अतुल कोठारी यांच्या हस्ते मंगळवारी होणार आहे. अतुल कोठारी हे उद्घाटनपर भाषणाच्या ‘ वर्गा’त देशातील ६० कुलगुरूंचे ‘बौद्धीक’ घेतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आज एआययू पदाधिकाऱ्यांसमवेत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद कक्षात पत्रकार परिषद घेतली. यावेळी एआययूचे उपाध्यक्ष डॉ.जी.डी.शर्मा, महासचिव डॉ.पंकज मित्तल, नोडल ऑफिसर विजेंद्र कुमार, सत्यपाल, डॉ.मुस्तजीब खान, डॉ.बीना सेंगर, संयोजक एस.जी.शिंदे आदींची उपस्थिती होती.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हसिटीज अर्थात एआययूने पश्चिम विभागीय कुलगुरु परिषदेचे यजमानपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिले आहे. २१ व २२ फेब्रुवारी रोजी हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये ही परिषद होईल. या दोन दिवशीय परिषदेचे उद्घाटन शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाचे सचिव अतुल कोठारी यांच्या हस्ते मंगळवारी, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होईल. समारोपास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच ’एआययू’चे सर्व पदाधिकारी व उच्च शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दोन्ही कार्यक्रमास एआययूचे अध्यक्ष व कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुरंजन दास, उपाध्यक्ष डॉ.जी.डी.शर्मा (कुलगुरु, यूएसटीएम विद्यापीठ, मेघालय), महासचिव डॉ.पंकज मित्तल व संयोजक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. दोन दिवसात सहा सत्रात या विषयावर चर्चा होणार आहेत. महाराष्ट्र, गोवा, गुजरात व राजस्थानमधील ६० कुलगुरुंनी परिषदेस उपस्थित राहण्याबाबत कळविले आहे, असेही मा.डॉ.प्रमोद येवले म्हणाले. परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्व कुलगुरु, पदाधिकारी मंगळवारी दुपारनंतर विद्यापीठास भेट देणार आहेत.
मराठवाडयासाठी गौरवाचा क्षण-येवलेः जवळपास १५ वर्षानंतर परिचय विभागीय कुलगुरु परिषदेचे यजमानपद मिळाले ही आनंदाची बाब आहे. हा एका अर्थाने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या मराठवाडयाचा बहुमान आहे, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.
कोण आहेत अतुल कोठारी?: अतुल कोठारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विद्यार्थी आघाडी असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महामंत्री म्हणून काम केले आहे. सध्या ते शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सचिव आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक दीनानाथ बत्रा यांनी १८ मे २००७ रोजी या न्यासाची स्थापना केली आहे. शिक्षणाचे ‘भारतीयीकरण’ आवश्यक असल्याचे मानून हा न्यास काम करत आला आहे. हा न्यास शिक्षण क्षेत्रात काम करणारी आरएसएसची आघाडी आहे. या न्यासाच्या कार्यक्रमांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांचा कायमच वावर राहिला आहे. न्यासाची नाळ आरएसएसशी घट्ट बांधलेली आहे. त्याचे हे काही पुरावेः