नागपुरातील पराभव भाजपच्या जिव्हारी: बावनकुळे म्हणाले, गाणार हे भाजपचे उमेदवारच नव्हते; मात्र मुनगंटीवार म्हणतात…


नागपूर/मुंबईः नागपूर शिक्षक मतदारसंघात झालेला पराभव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतो. या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि भाजप पुरस्कृत विद्यमान अपक्ष आमदार नागोराव गाणार यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी दणदणीत पराभव केल्यामुळे जिव्हारी लागलेले हे अपयश झाकण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गाणार हे भाजपचे उमेदवारच नव्हते, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. या उलट अन्य एक भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र आम्ही या पराभवाचे विश्लेषण करू असे म्हटले आहे. बावनकुळे म्हणतात त्याप्रमाणे जर गाणार हे भाजप उमेदवारच नव्हते, तर मुनगंटीवार कश्याचे विश्लेषण करणार आहेत? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघात शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार यांना भाजपने पुरस्कृत करून पाठींबा जाहीर केला होता. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या प्रचाराला लागली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गाणार यांच्या प्रचारार्थ सभाही घेतल्या होत्या. प्रचारसभांमधून भाजप नेते नागोराव गाणार हे भाजपचेच उमेदवार असल्याचे जाहीरपणे सांगत होते.

मतदानाच्या दिवशी भाजपने ठिकठिकाणी गाणार यांच्यासाठी बुथही लावले होते. परंतु त्यांचा पराभव होताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी कल्टी मारल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून या पराभव जिव्हारी लागल्यामुळे आणि देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर आलेले हे अपयश पचवणे अवघड जात असल्यामुळे दुःख विरेचनासाठीच बावनकुळे गाणार भाजपचे उमेदवार नसल्याचे सांगत आहेत, अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

नागपुरातील पराभवावर माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, गाणार हे भाजपचे उमेदवार नव्हते तर ते शिक्षक परिषदेचे उमेदवार होते. भाजपचे उमेदवार असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. उमेदवार भाजपाच नाही, एबी फॉर्म भाजपचा नाही. त्यामुळे याला अपयश वगैरे म्हणता येणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

मुनगंटीवारांना मात्र भाजपचा पराभव मान्यः नागपुरातील पराभवावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. नागपूरची जागा २०१० च्या आधी १८ वर्षे काँग्रेस समर्थित उमेदवारांच्या ताब्यात होती. मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर १८ वर्षांनंतर ही जागा आमच्या ताब्यात आली. गेली १२ वर्षे ती जागा भाजपकडे होती. साधारणतः विजय झाल्यानंतर माजायचे नाही आणि पराभव झाल्यानंतर खचायचे नाही, या तत्वावर आम्ही काम करतो. त्यामुळे पराभवाचे नक्कीच विश्लेषण करू. जिथे उणीव असेल ती भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू, आज पराभव झाला म्हणजे खचायचे कारण नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!