‘छत्रपती संभाजीनगर’ हे नामांतर फक्त ‘औरंगाबाद’ शहराचे की संपूर्ण जिल्ह्याचे?, सवाल, स्वागत आणि विरोध; राजकारण पेटले


मुंबईः  औरंगाबाद शहराचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर ‘धाराशिव’ असे करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून या दोन्ही शहरांचे नामांतर करण्यास नाहरकत बहाल केली आहे. आता या नामांतरावरून राजकारण पेटले असून हे नामांतर केवळ औरंगाबाद शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे आहे? यापुढे छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद असे लिहावे लागणार आहे का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तर औरंगाबाद शहराच्या नामांतराला आम्ही यापुढेही विरोध करत राहणार असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने २२ ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून या दोन्ही शहराच्या नामांतराची अधिसूचना गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्याचे निर्देशही सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांना दिले आहेत.

केंद्र सरकारने जारी केलेल्या मंजुरी पत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद शहराचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे करण्यास केंद्र सरकारची कुठलीही हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फक्त औरंगाबाद शहरचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि जिल्ह्याचे नाव मात्र ‘औरंगाबाद जिल्हा’ असेच राहणार काय? असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावरून औरंगाबादच्या नामांतरावरून राजकारण तीव्र झाले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरूनच राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. ‘हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे? यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीगनर असावा. तालुका ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’’  असे यापुढे लिहावे लागेल का? हे पण सांगा देवेंद्र फडणवीसजी!  असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे.

दानवेंच्या या प्रश्नाला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आले. दानवेंनी केलेले ट्विट रिटिवट करत फडणवीसांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र हे नामांतर फक्त औरंगाबाद शहराचे की संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे? या प्रश्नाचे थेट उत्तर त्यांनीही दिले नाही.

 अंबादास दानवेंनी आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्यावी. केंद्र सरकराची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. परंतु हे नामांतर फक्त औरंगाबाद शहराचे आहे की संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे या दानवेंच्या प्रश्नाला थेट उत्तर देणे फडणवीसांनी टाळले आहे.

आधीही विरोध, पुढेही विरोधच करणार-खा. जलीलः औरंगाबादच्या नामांतराला एमआयएमने विरोध केला आहे. मी औरंगाबाद शहराच्या नामांतराला याधीही विरोध केला होता. भविष्यातही आम्ही याला विरोधच करणार, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. नामांतराला आमचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. आमचा विरोध फक्त नामांतराला आहे. आमचा छत्रपती संभाजी महाराजांना विरोध नाही. भविष्यातही त्यांच्या नावाला विरोध करणार नाही. आम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचाच आदर करतो, असे खा. जलील म्हणाले.

 या महापुरूषांचे नाव घेऊन आम्ही कधीही राजकारण केले नाही. ते राजकीय स्वार्थासाठी महापुरूषांच्या नावाचा वापर करत आलेले आहेत. आम्ही नामांतराला विरोध केला, भविष्यातही करतच राहणार. कारण सरकारकडे लोकांना दाखवण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे अशा प्रकारचे मुद्दे ते पुढे आणतात. लोकांना भावनिक मुद्द्यात कसे अडकवायचे हे त्याचेच उदाहरण आहे, असेही खा. जलील म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!