शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू राहणार, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत संधी


मुंबई: भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम ३० डिसेंबर २०२३ रोजी संपला असला तरी शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीकरिता मतदार नाव नोंदणी करण्याकरिता निरंतर अद्यावतन कार्यक्रम प्रक्रिया सुरु राहणार आहे.

पुरवणी यादीच्या स्वरुपात मतदारांची नावे अंतिम मतदार यादीस जोडण्यात येतील.  मात्र, या निवडणुकांच्या नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर मतदार यादीमध्ये कोणतीही दुरुस्ती/सुधारणा करता येणार नाही.

३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिध्द झालेल्या मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्यांमध्ये पात्र व्यक्तीचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्‍ट नसेल, अशी व्यक्ती मतदार यादीमध्ये विहित प्रपत्रातील अर्जाद्वारे अद्यापही आपली नाव नोंदणी करु शकते, असे राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपसचिव म. रा. पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळवले आहे.

विधानपरिषदेच्या मुंबई व कोकण विभाग पदवीधर, मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. त्याकरिता मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत राबवण्यात आाला. आता अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असे पारकर म्हणाले.

या मतदार संघामध्ये सन २०१८ मध्ये नोंदवण्यात आलेल्या मतदारांची संख्या व सन २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांकरीता तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीतील मतदारांची संख्येची माहिती अशी-
मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात २०१८ च्या निवडणुकीसाठी  ४५७३५ मतदार नोंदणी झाली होती. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ९११२० मतदार नोंदणी झाली आहे. कोकण विभाग पदवीधार विधान परिषद मतदारसंघासाठी २०१८ मध्ये १०४४८८ एकूण मतदार होते. २०२४ च्या निवडणुकासाठी १७७४६५ मतदार नोंदले गेले आहेत. मुंबई शिक्षक विधान परिषद मतदारसंघात २०१८ मध्ये ८७२२ एकूण मतदार होते. २०२४ च्या निवडणुकासाठी १४५५८ मतदार नोंदले गेले आहेत. नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात २०१८ च्या निवडणुकीत ५३८९२ मतदार होते. आता २०२४ च्या निवडणुकासाठी  ६४८०२ मतदार नोंदले गेले आहेत.

पदवीधर मतदार नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज (प्रपत्र क्र.१८) भरु शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://gterollregistration.mahait.org/ ज्या पात्र शिक्षक मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नाही, असे पात्र शिक्षक मतदार नाव नोंदणी करण्याकरिता ऑफलाईन अर्ज (प्रपत्र-१९) त्यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत भरु शकतात.

यासाठीचे अर्ज विभागीय आयुक्त (या निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी), संबधित जिल्हाधिकारी  (या निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी), विभागीय आयुक्तांकडून पदनिर्देशित केलेले उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.

योग्यरित्या भरलेले अर्ज त्या कार्यालयात भरुन देता येतील. त्याच प्रमाणे, हा नमुना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर Downloads/DownloadForms/Form-18.pdf  तसेच, Downloads/DownloadForms/Form-19.pdf  व  Downloads/DownloadForms/Certificate -Form-19.pdf  येथे सुद्धा उपलब्ध आहे, असेही सह मुख्य निवडणूक अधिकारी पारकर यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!