…तर नरेंद्र मोदी-अमित शाहांना २०२४ च्या निवडणुकीनंतर तुरूंगात टाकूः प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य


पुणेः देशाचा मतदार हाच देशाचा खरा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजप-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते पुण्यातील खडकवासला येथे आयोजित सभेत बोलत होते.

देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. दुर्दैवाने या यदेशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झाला आहे आणि नोकर मालक झाला आहे, अशी परिस्थिती आहे. आगामी काळात आपणाला ही भीती दूर करायची आहे. आज या सभेच्या ठिकीणी एवढ्या प्रचंड संख्येने आपण जमलो आहोत. जर याच ठिकाणी बीबीसीची डॉक्युमेंट्री दाखवली असती तर सर्वांनाच पोलिस पकडू शकतील का? जर पकडलेच तर एवढ्या लोकांना ठेवायला तुरूंगात जागा आहे का? असे सांगत झुकानेवाला चाहिए, सरकार झुकती है म्हणत २०२४ मध्ये यांना झुकवा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नरेंद्र मोदींची अवस्था दारूड्यासारखी

आपल्या घरातले सोन जेव्हा आपण गहाण ठेवतो आणि ते सोडवता येत नाही, त्यावरून आपले घर आर्थिकदृष्ट्या दुबळे असल्याचा निष्कर्ष काढला जातो. एखादा दारूडा अशावेळी घरातील भांडीकुंडी विकून घर चालवतो. सगळे विकून झाले की दारूडा आपले घरही विकून टाकतो. आज नरेंद्र मोदी तेच करत आहेत की नाही सांगा?  असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

नेहरूंनी देश उभा केला, मोदींचा विकण्याचा सपाटा सुरू

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अत्यंत कष्टाने देश उभा केला. डॉ. होमी भाभा यांच्या संशोधनाच्या आधारावर नेहरूंनी देशात कारखाने उभे केले. ते कारखानेच आज भारताचा कणा आहेत. मात्र तेच कारखाने मोदी दारूड्यासारखा विकायला लागला आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

चार प्रश्नांची उत्तरे द्याः मोदी-भागवतांना खुले आव्हान

घर चालवायला आपल्याला हजार रुपये लागत असतील आणि आपली कमाई ८०० रुपये असेल तर वरचे २०० रुपये कर्ज काढावे लागते. त्याचप्रमाणे मोदी आज कर्ज काढून देश चालवत आहेत. या कर्जासाठी कारखाने विकण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे. आर्थिकदृष्ट्या या देशाचे वाटोळे करण्याचे काम सुरू आहे. मला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना एकाच व्यासपीठावर बसवा. मी त्यांना चार प्रश्न विचारतो. त्याची त्यांनी उत्तरे देऊन दाखवावीत किंवा मोहन भागवतांनी तरी समोर यावे, असे आव्हानही प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

मोदीच्या व्यवस्थेत न्याय मिळणार नाही म्हणून अंबानी देश सोडून गेलाः उद्योगपती मुकेश अंबानी देश सोडून निघून गेले आहेत. ज्या वाझेने अँटिलियाजवळ बॉम्ब ठेवला, त्याच वाझेला आता माफीचा साक्षीदार केले जाणार आहे. आपल्याला चाकू मारणाऱ्याला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच आरोपीला जर माफीचा साक्षीदार केले तर आपल्याला न्याय मिळेल का?  हे अंबानींच्या लक्षात आले. मोदींच्या व्यवस्थेत आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यामुळे ते देशच सोडून निघून गेले. आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीसोबत कायद्याची ही अवस्था आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!