राजधानी दिल्लीसह उत्तर भारताला भूकंपाचे जोरदार धक्के, ६.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेने परिसर हादरला


नवी दिल्लीः  देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात आज दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. दुपारी २ वाजून ५१ मिनिटांनी बसलेल्या जोरदार धक्क्यांमुळे जमीन हादरून गेली. परिणामी लोकांनी घरे आणि कार्यालयाबाहेर धाव घेतली.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार आज, मंगळवारी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर २ वाजून ५१ मिनिटांनी ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. दिल्लीबरोबरच उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील लखनऊलाही भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंपाचा धक्का साधारणपणे दहा सेकंदापर्यंत जाणवला. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक ठिकाणी भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे घरांची पडझड झाल्याची किंवा कोणतीही जिवित हानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्वसाधारणपणे ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप धोकादायक मानला जातो. या भूकंपाचे हादरे राजधानी दिल्लीसह हरियाणा, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमध्येही जाणवले.

उंच इमारतींमध्ये या भूकंपाची तीव्रता जास्त जाणवली. भूकंपाचे धक्के जाणवू लागताच लोक इमारतींमधून खाली उतरले. नवी दिल्लीतील लोकही भूकंपाचे हादरे बसू लागताच घराबाहेर आल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *