मराठवाड्याचा आणखी एक खासदार शिंदे गटाच्या वाटेवर; परभणीचे संजय जाधव, उस्मानाबादचे ओमराजेंकडे संशयाची सुई


मुंबईः  केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाचा वाद सुरू असताना उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेच्या १९ पैकी ६ लोकसभा खासदार आपल्या बाजूने असल्याचा दावा केला आहे. परंतु प्रत्यक्षात चारच खासदारांची शपथपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली असून शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शपथपत्र न देणाऱ्या त्या दोन खासदारांपैकी एक खासदार मराठवाड्यातील तर खासदार ठाण्यातील असल्याचा अंदाज बांधला जात आहे. मराठवाड्यातील परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यापैकी एकजण लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चाही रंगू लागली आहे.

 एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार सोबत घेऊन शिवसेनेत बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही दावा केला. या दाव्यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गटाने त्यांच्याकडे असलेल्या आमदार, खासदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे निवडणूक आयोगाकडे दाखल केली.

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या १९ पैकी १३ खासदारांची शपथपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली. उद्धव ठाकरे गटाने आपल्या बाजूने लोकसभेतील ६ आणि राज्यसभेतील ३ खासदार असल्याचा दावा केला. परंतु निवडणूक आयोगाकडे राज्यसभेतील ३ आणि लोकसभेतील चारच खासदारांची शपथपत्रे दाखल केली आहेत. त्यामुळे शपथपत्र दाखल न करणारे उद्धव ठाकरे गटातील लोकसभेतील ते दोन खासदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाकरे गटाकडे असलेल्या सहा खासदारांमध्ये मराठवाड्यातील परभणीचे संजय जाधव, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, ठाण्याचे राजन विचारे, मुंबई मध्यचे अरविंद सावंत, रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्राबाहेरील दादरा-नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांचा समावेश आहे. मात्र या या सहापैकी दोन खासदारांची शपथपत्रेच निवडणूक आयोगाला सादर झालेली नाहीत. शपथपत्र न देणारे ठाकरे गटातील ते दोन खासदार तटस्थ राहिले की त्यांनी आम्हीही शिंदे गटात जाणार असल्याचे निवडणूक आयोगाला कळवले? असे सवालही राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.

ठाकरे गटाच्या बाजूने असलेले परंतु शपथपत्र सादर न करणाऱ्या दोन खासदारांच्या नावांबद्दल राजकीय वर्तुळात अंदाजही बांधले जाऊ लागले आहेत. त्यात परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे संशयाची सुळ वळली आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचेही नाव उघडपणे घेतले जाऊ लागले आहे.

ठाकरे गटाच्या बाजूने असलेल्या मराठवाड्यातील दोन खासदारांपैकी एक खासदार लवकरच शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिंदे गटात सामील होणारे या दोनपैकी नेमका खासदार कोण? संजय जाधव की ओमराजे निंबाळकर?  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या दोनपैकी एक खासदार जर शिंदे गटात सामील झाला तर तो मराठवाड्यात उद्धव ठाकरे गटासाठी मोठा फटका असेल.

निवडणूक आयोगाच्या निकालात ठाकरे गटाने दावा केलेल्या सहापैकी फक्त चारच खासदारांची शपथपत्रे मिळाल्याचे नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!