मुंबईः राज्यातील सर्व माध्यमांच्या पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग आता सकाळी ९ वाजता किंवा ९ वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने याबाबतचे परिपत्रक गुरूवारी काढले आहे. शाळांच्या वेळातील हा बदल राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू असणार आहे. सध्या राज्यातील बहुतांश शाळांमध्ये पूबर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी सात वाजता भरवण्यात येतात. सकाळच्या या वर्गामुळे मुलांना लवकर उठावे लागते. त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात बोलताना लहान मुलांच्या सकाळच्या शाळेचा मुद्दा उपस्थित केला होता. पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतची मुले लहान असतात. त्यांचे वर्ग सकाळी ७ वाजता असल्यामुळे त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे अनेकदा त्यांची झोप पूर्ण होत नाही. परिणामी त्याचा त्रास मुलांना होतो. त्यामुळे या मुलांच्या शाळेची वेळ बदलावी, अशी सूचना राज्यपाल बैस यांनी केली होती.
राज्यपालांच्या या सूचनेनंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याबाबत अभ्यास करण्यात आला. राज्यातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणप्रेमी, पालक आणि प्रशासनातील अधिकारी यांचे अभिप्रायही मागवण्यात आले होते. त्यानुसार काही बाबी परिषदेच्या निदर्शनास आल्या.
शाळांच्या वेळातील बदल करण्याचा निर्णय घेताना सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांच्या वेळा आणि शाळांच्या वेळा समांतर येणार नाहीत, याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खासगी शाळा भरण्याच्या वेळा या सकाळी सातनंतर आहेत. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरात उशिरापर्यंत सुरू असलेले ध्वनिप्रदूषण (उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजवले जाणारे कर्कश संगीत) इत्यादी अशा विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत आणि सकाळी लवकरच शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे.
पाल्यांची झोप सकाळी पूर्ण होत नसल्यामुळे सकाळी लवकर शाळेत जाण्यास तयार नसतात. याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस आणि व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शाळांच्या वेळेत बदल करून प्राथमिकस्तरावरील विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राचा विचार करावा, अशा सूचना पालकांनी केल्या.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या अभ्यासातून पुढे आलेली माहिती आणि पालक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणप्रेमींकडून आलेल्या सूचना या परिस्थितीचा विचार करून सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
शाळांच्या वेळात बदल करताना बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा २००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन- अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणताही बाधा येणार नाही, याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घेण्याच्या सूचनाही राज्य सरकारने या परिपत्रकात केल्या आहेत. ज्या शाळा व्यवस्थापनांना आपल्या शाळांच्या वेळा बदलणे अगदीच शक्य होत नसेल तर त्यांनी त्यांच्या अडचणी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षकांना यांच्याकडे सोपवाव्यात, असेही या परित्रकात म्हटले आहे.