दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार मीडियाला परस्पर सांगू नका, बोभाटा टाळण्यासाठी बोर्डाच्या सचिवांचा अजब फतवा


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्रावर चालणाऱ्या कारभारामुळे या परीक्षा आणि परीक्षा घेणारे बोर्ड बदनाम होते. या परीक्षेच्या काळात होणाऱ्या गैरप्रकारांचा बोभाटा होऊ नये म्हणून आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागीय मंडळाने नामी युक्ती शोधून काढली आहे. परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकारांची माहिती परस्पर प्रसारमाध्यमांना देऊ नये, असा फतवाच छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाने काढला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेबु्रवारी ते १९ मार्चदरम्यान होणार आहे तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्चदरम्यान होणार आहे.

या दोन्ही परीक्षांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागीय मंडळाच्या सचिव डॉ. वैशाली जमादार यांनी विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे एक आदेश जारी केला आहे.

‘फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता समितीची नियुक्ती करण्याबाबत’  असा विषय असलेले हे परिपत्रक २९ जानेवारी रोजी जारी करण्यात आले आहे.

परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाच्या वतीने नेहमीच खबरदारी घेण्यात येते. परंतु, अनेक केंद्रांवर खुलेआम कॉप्यांचा सुळसुळाट बघावयास मिळतो़. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक परीक्षा केंद्रांवर यापूर्वी अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. गेल्यावर्षी तर राज्यात अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर आले. इयत्ता १२ वीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली होती. वृत्तवाहिन्यांवर ही बातमी झळकल्यामुळे मोठा गहजब झाला होता.

 त्याआधी परभणी जिल्ह्यात शिक्षकांनीच विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचा पेपर फोडून उत्तरे लिहिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सहा शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. परीक्षेच्या काळात घडलेल्या या गैरप्रकारांचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते. आगामी परीक्षांच्या काळात असे प्रकार समोर येऊ नये आणि त्याचा बोभाटा होऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागीय मंडळाने नामी युक्ती शोधून काढली आहे.

परीक्षा केंद्रावर घडलेल्या कोणत्याही गैरप्रकाराची माहिती प्रसार माध्यमांना परस्पर देण्यात येऊ नये, असे विभागीय मंडळाच्या सचिव डॉ. वैशाली जमादार यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहे. डॉ. जमादार यांचा हा फतवा परीक्षा काळात घडणाऱ्या गैरप्रकारांवर पांघरूण घालण्यासाठी तर नाही ना? अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव डॉ. वैशाली जमादार यांनी काढलेला हाच तो फतवा.

काय आहे फतव्यात?

परीक्षा संचलन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नये म्हणून शासनस्तरावर प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी दक्षता समितीची स्थापना केली आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दक्षता समितीची बैठक आयोजित करावी. या बैठकीत जिल्ह्यातील परीक्षा संचालनाबाबत, उपद्रवी केंद्राबाबत सभेत माहिती देऊन केंद्रावर वारंवार भेटी देण्याबाबत विनंती करावी. दक्षता समितीच्या सदस्यांनी केंद्रावरील गैरप्रकाराच्या संदर्भात प्रसार माध्यमांना परस्पर कोणतीही माहिती देऊ नये. अशी माहिती प्रथमत: विभागीय अध्यक्षांना देण्याबाबत या फतव्यात सूचित करण्यात आले आहे.

 कोंबडा झाकल्यावर आरवायचे थांबतो का?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव डॉ. वैशाली जमादार यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बजावलेल्या या फतव्याच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘कोंबडा कितीही झाकला तरी तो आरवायचे थांबत नाही’ अशी जी म्हण आहे, त्याच प्रमाणे दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावर झालेले गैरप्रकार थेट मीडियाला सांगू नका असे फर्मान दक्षता समितीच्या सदस्यांना सोडून विभागीय सचिवांना नेमके काय साध्य करायचे आहे? गैरप्रकारांवर पांघरूण घालण्यासाठीच तर हा त्यांचा आटापीटा नाही ना? गैरप्रकार हा गैरप्रकारच आहे, तो खुलेपणाने मान्य करून पुढे तो घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या उपाययोजना करणे ही जबाबदारी असताना असे फर्मान काढण्याचा डॉ. जमादार यांचा नेमका उद्देश काय? हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्याची उत्तरे डॉ. जमादार यांनी जाहीरपणे द्यावीत, असे न्यूजटाऊनचे त्यांना खुले आव्हान आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!