मुंबई: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट अन्न व औषध परवाना व दस्तऐवज वापरुन निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्या प्रकरणी पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट अन्न व औषध परवाना व दस्तऐवज वापरुन निविदा प्रक्रियेत सहभाग घेवून निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाला असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
या समितीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेस प्रत्यक्ष भेट देवून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल आवश्यक कागदपत्रांसह त्वरित सादर करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण, सदस्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. हेमंत गोडबोले, धुळ्याच्या श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. सुनिल लिलानी, , वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रशासकीय अधिकारी समाधान जामकर हे समितीचे सदस्य आहेत.