
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): ‘तुम्हीच एकटे शहाणे आणि बाकीचे सगळे गाढव आहेत का?’ अशी मुक्ताफळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी आज (३० सप्टेंबर) झालेल्या अधिसभा बैठकीत उधळली. त्यामुळे अधिसभा सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त करत ‘आमचा कुलगुरू गाढव कसा असू शकतो?’ असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे स्वतःच्याच तोंडाने स्वतःचीच गोची करून घेत अडचणीत सापडलेल्या कुलगुरूंना आपले शब्द मागे घेत हाराकिरी पत्करावी लागली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची आजची अधिसभेची बैठक गाजली ती महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींना फाटा देत ‘स्वतःचेच नियम’ लादून अधिसभा सदस्यांना बैठकीत ठराव मांडण्यापासून रोखण्याचा विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांवरून! अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड यांनी बैठकीच्या १९ दिवस आधी म्हणजे ११ सप्टेंबर रोजी ‘सध्याचे विद्यापीठ गीत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे गीत आहे, हे कोठेही ध्वनित होत नाही. त्यामुळे या विद्यापीठ गीतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नागसेनवन परिसर, विद्यापीठ नामांतर आंदोलन इत्यादी बाबींची उल्लेख करून विद्यापीठ गीताचे विस्तारीकरण करण्यात यावे, असा ठराव विद्यापीठ प्रशासनाला दिला होता.
डॉ. उमाकांत राठोड यांच्या ठरावावर सूचक आणि अनुमोदकाचे नाव आणि स्वाक्षरी नाही, असे तांत्रिक कारण पुढे करून विद्यापीठ प्रशासनाने अधिसभा बैठकीच्या अजेंड्यावर हा ठराव घेण्यास नकार दिला होता. सूचक आणि अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्याचा ‘स्वतःचाच नियम’ लावून अधिसभा सदस्यांनी मांडलेले ठराव बाजूला ठेवण्याचा विद्यापीठ प्रशासनाकडून झालेला हा प्रयत्न अधिसभा सदस्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्याचे जोरदार पडसाद आज झालेल्या अधिसभा बैठकीत उमटले. या बैठकीत विद्यापीठ गीताच्या विस्तारीकरणाचा ठराव मांडण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. परंतु तुम्हाला आता ठराव मांडता येणार नाही, आम्ही तो घेणार नाही, अशी भूमिका कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी घेतली.
कुलगुरूंच्या या भूमिकेवर अधिसभा सदस्यांनी अशी तरतूद कोणत्या नियमात आहे हे दाखवा? असा सवाल करत अधिसभा बैठकीत ठराव मांडण्यासाठीची महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील कलम ६ (१) मधील तरतूद वाचून दाखवली. या तरतुदीनुसार एखाद्या अधिसभा सदस्याने बैठकीत प्रस्ताव मांडायचा, त्याला बाकीच्या अधिसभा सदस्यांनी अनुमोदन द्यायचे आणि हा प्रस्ताव स्वीकारल्याचे कुलगुरूंनी घोषित केल्यानंतर तो प्रस्ताव चर्चेला ठेवायचा, अशी प्रक्रिया असताना तुम्ही आम्हाला आता ठराव मांडू देणार नाही आणि आम्ही तो घेणारही नाही? असे कसे म्हणता? असा सवाल उमाकांत राठोड यांनी केला.
डॉ. राठोड यांच्या या प्रश्नावर कुलगुरू डॉ. विजय फुलारी संतापले आणि त्यांनी ‘तुम्हीच किती बोलताय? तुम्ही एकटेच शहाणे आणि बाकीचे सगळे गाढव आहेत का?’ अशी मुक्ताफळे उधळली. त्यामुळे अधिसभा सदस्य संतप्त झाले. त्यावर ‘कोण गाढव आहे? इथे बसलेले गाढव आहेत का? असे सवाल अधिसभा सदस्यांनी उपस्थित केले. त्यावर ‘तुम्हाला नाही म्हटलंय, आम्ही गाढव आहोत’ असे कुलगुरू डॉ. फुलारी म्हणाले.
कुलगुरूंच्या या उत्तराने अधिसभा सदस्य आणखीच संतप्त झाले. ‘आमचा कुलगुरू गाढव कसा असू शकतो?’ असा सवाल डॉ. उमाकांत राठोड यांनी केला. हे शब्द असंसदीय आहेत, तुम्ही स्वतःलाही गाढव म्हणून घेऊ शकत नाही. त्यामुळे हे मागे घ्या, अशी मागणी अधिसभा सदस्य संजय कांबळे यांनी केली. शेवटी स्वतःच्याच तोंडाने स्वतःचीच गोची करून घेतलेले कुलगुरू डॉ. फुलारी यांनी हाराकिरी पत्करत आपले शब्द मागे घेतले आणि सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याचे निर्देश दिले.
नंतर डॉ. उमाकांत राठोड यांनी विद्यापीठ गीताच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला प्रा. सुनिल मगरे यांनी अनुमोदन दिले. सभागृहातील सर्वच सदस्यांनी एकमुखाने हा ठराव मंजूर केला. आता विद्यापीठ गीताच्या विस्तारीकरणाबद्दल एक समिती नेमून या समितीकडून अहवाल मागवला जाईल. तो अहवाल कुलपती तथा राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल आणि कुलपतींच्या मंजुरीनंतर विद्यापीठ गीताचे विस्तारीकरण करण्यात येईल.
‘अपात्र’ महाविद्यालये ‘पात्र’ कशी ठरवली?
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित पदव्युत्तर महाविद्यालयांची विशेष समिती पाठवून झाडाझडती घेण्यात आली आणि या समितीच्या अहवालावरून तब्बल ११३ महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्यात आले होते. त्यावरून मोठे वादंगही झाले होते. हा मुद्दा आजच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.
‘आधी पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यास अपात्र ठरलेल्या महाविद्यालयांना नंतर पात्र कसे ठरवले?’ असा सवाल उपस्थित करत अधिसभा सदस्य प्रा. सुनिल मगरे यांनी या सर्वच महाविद्यालयांचे चौकशी अहवाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकून सर्वांसाठी खुले करा, अशी मागणी केली. त्यावर आम्ही व्यवस्थितच काम केले असे सांगत विद्यापीठ प्रशासनाने हे अहवाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकून सार्वजनिक करण्यास नकार दिला.
शुल्क माफीचा एकमुखी ठराव
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली. शेती खरवडून गेली. त्यामुळे मराठवाड्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याची एकमुखी मागणी सर्वच अधिसभा सदस्यांनी लावून धरली. या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
