मुंबई: शासनाच्या पाठपुराव्यामुळे राज्यात नवीन ८ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्री कालावधीत मुंबई, नाशिक, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, अंबरनाथ, भंडारा आणि हिंगोली अशा एकूण १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. या आठ महाविद्यालयात एकूण ८०० विद्यार्थ्यांना एमबीबीएस करीता प्रवेश मिळणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे शासनाचे धोरण आहे. आता राज्यात एकूण ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. आता वर्षाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४,८५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी विविध देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जात होते. विद्यार्थी संख्या वाढल्याने आता विद्यार्थी राज्यातच शिक्षण घेऊ शकतात.
या १० महाविद्यालयांच्या बांधकामाकरिता व इतर आवश्यक साधनसामुग्रीसाठी प्रत्येक महाविद्यालयास ४०३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होण्यासाठी केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत १० महाविद्यालयाची बांधकाम निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच बांधकामे सुरू कराण्यात येणार आहे.