धुळेः महाराष्ट्रातील सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीच्या नेत्या, अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत सरोज कांबळे यांचा ५ जून रोजी धुळ्यात संशयास्पद मृत्यू झाला. चळवळीसाठी आयुष्य वेचणाऱ्या सरोज कांबळे यांच्या निधनाची दखल महाराष्ट्रातील माध्यमांनी चारओळींच्या बातमीनेही घेतली नाही. मृत्यूनंतरही उपेक्षा झालेल्या सरोज कांबळे या प्रचंड दहशतीखाली होत्या. मृत्यूच्या भयाने त्या सैरावर झाल्या होत्या. त्यांचा मुलगाच ईनायत रणजित परदेशी हा त्यांचा गेल्या चार-पाच वर्षांपासून अमानुष छळ करत होता. स्वंयपाक घरातील सांडशी तप्त करून चटके द्यायचा. प्रा. रणजित परदेशी यांची लघवी पाजायचा. त्यातील एक थेंब जरी खाली पडला तर अमानुष मारझोड करायचा. याबाबत खुद्द सरोज कांबळे यांनीच मृत्यूच्या दोन महिने आधी लिहून ठेवली तक्रार आणि मुलगा ईनायतने केलेल्या हिंस्त्र मारहाणीची छायाचित्रे न्यूजटाऊनच्या हाती आली आहेत.
मुलगा ईनायतच्या अमानुष छळाला कंटाळून ३ मार्च रोजी सरोज कांबळे बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर ईनायत परदेशीने सरोज कांबळे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. परंतु सरोज कांबळे या ईनायतच्या अमानुष छळाला कंटाळून मृत्यूच्या भयाने मालेगाव येथील नातेवाईक आणि नंतर येवला येथे एका कार्यकर्त्याच्या आश्रयाला गेल्या होत्या. त्यानंतर ईनायतने सरोज कांबळे यांना ज्यांनी ज्यांनी आश्रय दिला, त्यांनी आपल्या आईचे अपहरण केल्याच्या खोट्या तक्रारी करून त्यांना त्रास द्यायला सुरू केला होता. त्यांच्या घरी तो माणसेही पाठवू लागला होता.
हेही वाचाः सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीच्या नेत्या सरोज कांबळे यांचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवाल गुलदस्त्यात!
आपल्यामुळे आश्रय देणाऱ्या व्यक्तींना त्रास नको म्हणून सरोज कांबळे यांनी २ एप्रिल २०२३ रोजी कल्याणमध्ये राहणारी त्यांची बहीण सुधा सुकदेव काटकर यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. कल्याणला जाण्यापूर्वी सरोज कांबळे यांनी २ एप्रिल रोजी स्वतःच्या स्वाक्षरीनिशी ईनायतविरोधात तक्रार लिहून ठेवली होती. या तक्रारीचे पाच सेट करण्यात आले होते. त्यापैकी एक सेट मालेगावच्या नातेवाईकाकडे, एक सेट येवल्याच्या तर तीन सेट सिंदखेड राजाच्या कार्यकर्त्याकडे ठेवण्यात आले होते. कल्याणला येऊनही ईनायतने छळायला सुरूवात केली तर ही तक्रार पाठवून द्या, असा निरोप देऊन सरोज कांबळे कल्याणला बहिणीकडे गेल्या होत्या. या तक्रारीतून ईनायत परदेशी त्यांचा किती अमानुषपणे छळ करत होता, याचा उलगडा होतो.
२७ फेब्रुवारी २०२३ रोजी काय घडले? का बेपत्ता झाल्या होत्या सरोजताई?
सरोज कांबळे धुळ्यातील ज्या घरात रहात होत्या, त्या घराचे बक्षीसपत्र माझ्या नावे करून दे म्हणून २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुलगा ईनायत परदेशीने सरोज कांबळे यांना अमानुष मारहाण केली होती. मारहाण करून रक्तबंबाळ अवस्थेतच ईनायतने सरोज कांबळे यांना धुळे रजिस्ट्री ऑफिसला पाठवले होते. सरोज कांबळे या कार्यालयात गेल्यानंतर खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे भोवळ येऊन पडल्या. तेथील कर्मचारी प्रतिभा खैरनार यांनी चहा-बिस्किटे देऊन धीर दिला.
नंतर ऍड. मधुकर भिसे व मिलिंद बैसाने यांनी सरोज कांबळे यांना जुने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. रक्तदाब व शुगर वाढल्यामुळे तेथून त्यांना नवीन सिव्हिल हिरे मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले. तेथे क्षकिरण चाचणी केल्यानंतर सरोज कांबळे यांचे दोन्ही मनगट आणि पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले.
तेथेही जाऊन ईनायतने सरोज कांबळे यांना घरी चाल म्हणून दमदाटी केली. सरोज कांबळे ३ मार्च २०२३ पर्यंत येथेच ऍडमिट होत्या. तेथे दररोज येऊन ईनायत दमदाटी आणि शिविगाळ करत होता. त्यामुळे ३ मार्च रोजी सरोज कांबळे अत्यंत भांबावलेल्या अवस्थेत नवीन सिव्हिल हॉस्पीटलमधून बाहेर पडल्या आणि मालेगाव येथील नातेवाईकाकडे आश्रयाला गेल्या होत्या.
या क्रौर्याला सीमा नाही…
मुलगा ईनायत परदेशी आई सरोज कांबळे यांचा अत्यंत क्रूरपणे अमानुष छळ करत होता. मारहाण करत होता. सांडशी गरम करून त्यांना चटके देत होता. तप्त झालेल्या सांडशीने त्यांचे गाल लोचत होता. चेहरा, हातपाय, पोट अशा जिथे वाटेल त्या भागावर चटके निर्दयपणे चटके होता. रणजित परदेशी यांची लघवी पाजत होता. त्या लघवीचा एक थेंबही सांडला की हिंस्त्रपणे मारहाण करत होता. ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतला, तिच्यावर इतक्या अमानुष, हिंस्त्रपणे तो अत्याचार करत होता. जी छायाचित्र न्यूजटाऊनच्या हाती आली आहेत, त्यातून ईनायत परदेशीचा हिंस्त्रपणा स्पष्टपणे दिसतो. ही छायाचित्र साधारणतः तीन महिन्यांपूर्वीची आहेत.
सरोज कांबळे यांनी २ एप्रिल २०२३ रोजी लिहून ठेवलेली तक्रार त्यांच्याच शब्दांत…
प्रति,
मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबई-३२
महोदय,
तक्रार : माझा मुलगा ईनायत रणजित परदेशी हा माझा अमानुष छळ करतो त्याच्यापासून माझ्या जिवितास धोका आहे.
तक्रारदार: श्रीमती सरोजिनी फकिरा कांबळे, वय- ६६ वर्ष, नटराज थेअटर समोर, काझी प्लॉट, धुळे.
माझा मुलगा ईनायत रणजित परदेशी हा माझा अमानुषपणे छळ करतो. याबाबत मी माझा संपूर्ण जबाब देत आहे. त्यानुसार माझा जबाब नोंदवून घेण्यात यावा व या प्रमाणे फिर्याद नोंदवून घेण्यात यावी. माझा हा जबाब देण्यासाठी मानसिकदृष्ट्या सुस्थितीत असून करिता माझा जबाब नोंदून घेण्यात यावा.
मी प्रा. रणजित परदेशी यांची पत्नी असून आम्हाला एक अपत्य नामे ईनायत वय-३६ आहे. मी यासह धुळे येथे काझी प्लॉट, नटराज टॉकीजसमोर कायमस्वरूपी वास्तव्यास आहे. माझे पती प्रा. रणजित परदेशी गेल्या ४ ते ५ वर्षापासून पार्किन्सन व इतर आजाराने ग्रस्त आहेत. माझीही प्रकृती सतत खालावत असते.
जबाब देण्याचे कारण की गेल्या ४ ते ५ वर्षापासून माझा मुलगा इनायन याने मला सतत मारहाण करतो. वडिलांच्या आजारपणाला मला जबाबदार धरणे, माझ्या चारित्र्यावर संशय घेवून प्रचंड मारहाण करणे, लाथा बुक्क्यांनी मारहाण करतो, छातीत पोटात मारहाण करणे, सांडशी गरम करून चटके देणे, डोके फोडणे असे अमानुषपणे सतत मारहाण करत असतो. तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देणे सतत चालू असते.
हाड फ्रक्चर करणे, डोके फोडणे, चटके देणे, दरवाजा बंद करून शारीरिक छळ सतत करतो. तसेच आजारी असलेले पती प्रा. रणजीत सर यांची लघवी प्यायला देतो जर त्यातील एक थेंब जरी खाली सांडला तर अमानुष मारहाण करीत असतो.
हे सर्व अत्याचार गेली ४-५ वर्षापासून मी माझे पती आजारी असल्याकारणाने सहन करीत आहे. परंतु माझी अत्याचार सहन करण्याची सहनशक्ती आता संपली आहे. माझा मुलगा ईनायत हा आमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना हे माहीत झाले नाही पाहिजे यासाठी माझ्यावर सतत दबाव टाकत असतो.
आम्ही दोघेही पती-पत्नी पेन्शनधारक असून आमचे ATM कार्ड, बँक पासबुक, चेकबुक व मुदत ठेव पावत्या, बँक खात्याशी जोडले गेलेले मोबाईल मुलगा ईनायत याने सर्व ताब्यात घेतलेले असून, सर्व आर्थिक व्यवहार तो स्वतः करतो. त्यातील एक रुपयाही दाखवत नाही, मला मिळू देत नाही. माझे व माझ्या पतीचे आधारकार्ड, पॅनकार्ड, विमा पॉलिसीचे सर्व कागदपत्रे त्याने ताब्यात घेवून जप्त करून ठेवले आहे. आम्हाला कुठलेही एक रुपयाचेही आर्थिक स्वातंत्र्य नाही. प्रत्येक गोष्टीची बारकाईने लक्ष ठेवून सतत आमच्या बद्दल संशय ठेवून अन्याय करत असतो.
मला २७ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याने मारहाण केल्यावर रक्तबंबाळ अवस्थेत धुळे रजिस्ट्री ऑफीसला पाठवले. तेथे जाऊन मी माझे रहाते घर त्याच्या नावावर बक्षीसपत्र करून देण्यासठी पाठवले. सदर ऑफिसला मी गेल्यावर मला खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे मी भोवळ येवून पडली, तेव्हा तेथील कर्मचारी प्रतीभा खैरनार यांनी मला चहा-बिस्कीट देवून धीर दिला.
तेथून अँड. मधुकर भिसे व मिलींद बैसाने (ड्रायविंग स्कुल) यांनी मला सिव्हिल (जुने) हॉस्पीटलला दाखल केले तेथे माझी बीपी व शुगर वाढल्यामुळे तेथून पुढे मला नवीन सिव्हिल हिरे मेडिकल कॉलेज येथे इमर्जन्सी वार्डात अॅम्बुलन्सने नेऊन अॅडमिट केले. तेथे छातीचे, हातापायाचे एक्सरे काढण्यात आले त्यांनी माझे दोघे मनगट व पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले.
तेथे माझा मुलगा ईनायत आला व मला घरी चल असा दमदाटी करत होता. परंतु तेथील डॉ. दिपेश पटेल, डॉ. दीपक शिंदे, डॉ. दिव्या यांनी माझ्या पूर्ण प्रकृतीची तपासणी करुण तातडीने उपचार सुरु केले. या दरम्यान अॅड. विशाल साळवे, सिध्दार्थ जगदेव, सुधीर मोरे इत्यादी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले.
दरम्यान मुलगा ईनायत घरी चाल व बक्षीसपत्र करून दे तसेच वडिलांची तब्येत खराब आहे इथे थांबू नको अशा प्रकारे मला दवाखान्यतून घरी नेण्यासाठी दबाव टाकत होता. माझे पती गंभीर आजाराने २ वर्षांपासून एकप्रकारे बेडवरच आहेत. त्यांची सेवा करण्यासाठी मला कायम त्यांच्या जवळ रहावे लागते. मात्र सततच्या मारहाणीमुळे मला जीव वाचवत फिरावे लागत आहे.
या सर्व परीस्थितीमुळे मी मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून व भीतीपोटी दवाखान्यातच थांबण्याचा निर्णय घेतला व तसे घरी जाण्यासंबंधी डॉक्टरांनी मनाई केलेली होती. मी सदर नवीन सिव्हील येथे 3 मार्चपर्यंत अॅडमिट होते. मात्र ईनायत हा रोज हॉस्पीटलमध्ये येवून मला घरी घेवून जाण्यासाठी दमबाजी व शिवीगाळ करत होता.
या सर्व जाचाला कंटाळून दि. 3 मार्च रोजी मी अत्यंत भांबावलेल्या अवस्थेत व संभाव्य मारहाण लक्षात घेवून नवीन सिव्हिल हॉस्पीटल, धुळे येथून धडपडत बाहेर पडले. त्यानंतर मी आमच्या नातलग व ओळखीच्या लोकांच्या आश्रयाने मी स्व:खुशीने राहत होती. त्यानंतर मुलाने माझी खोटी मिसिंगची केस दाखल केली.
नंतर नातलग व जवळच्या लोकांना त्रास नको म्हणून मी येवल्यात आहे. माझ्या स्व: खुशीने राहत आहे. असे येवला येथे तपासणीस आलेल्या पोलीसास (बाळासाहेब डोईफोडे ) यांना जबाब दिला व सर्व हकीकत सांगितली की, मी मिसिंग नाही. मी माझ्या मुलाच्या जाचाला कंटाळून निघून आलेली आहे. व सध्या भगवान चिते याकडे राहत आहे.
या नंतर माझा मुलगा ईनायत याने माझ्या आईला पळवले आहे, तिचे अपहरण झाले आहे, असे सांगून जे लोक मला आश्रेय देतील त्यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सतत करत आहे. जेणेकरून मला कोणीही आश्रय, आधार देऊ नये. तसेच मला धमकावून घरी परत नेण्यासाठी मानसे पाठवून त्रास देत आहे.
आज दि. ०२/०४/२०२३ रोजी मला घेण्यासाठी आलेली माझी बहीण सुधा सुकदेव काटकर व बहिणीची मुलगी राजश्री शरद सूर्यवंशी सोबत, E-602, Rudraved, Vedant chs, near poddar international school, wayle nager khadakpada Kalyan west pin-421301 या ठिकाणी मी स्वखुशीने जात आहे. व पुढे तिच्याकडे राहणार आहे.
माझा मुलगा ईनायत तेथेही येऊन मला पुन्हा मारहाण करू शकतो व मला बळाचा वापर करून कुठेही घेऊन जाऊन माझ्या जिवाचे बरेवाईट करू शकतो. तसेच माझे पती धुळे येथे माझ्या स्वमालकीच्या घरात असून त्यांच्यावर देखील माझ्या मुलाने माझ्या समक्ष अमानुषपणे अत्याचार केले असून त्यांच्या जिवास देखील धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे आम्हा वयोवृद्ध पती-पत्नीस पोलीस संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. व मुलगा ईनायत यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी ही नम्र विनंती.
प्रत, मा. गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई -३२
मा. राज्य महिला आयोग, मुख्यालय, बांद्रा (पूर्व) मुबंई-४०००५१
मा. मानवी हक्क आयोग, मुख्यालय मुंबई-४००००१
मा. जिल्हा पोलीस प्रमुख, धुळे
मा. पोलिस निरक्षक साहेब, आजाद नगर पोलीस स्टेशन, धुळे
आपली विश्वासू
स्वाक्षरी सरोज कांबळे
अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे सत्यशोधक मार्क्सवादी या अमानुषतेवर गप्प का?
सरोज कांबळे यांचा गेल्या चार-पाच वर्षांपासून मुलगा ईनायत परदेशी अमानुष छळ करत होता, अमानवी अत्याचार करत होता. या अमानुषतेची कल्पना धुळ्याबरोबरच महाराष्ट्रातील काही सत्यशोधक मार्क्सवादी कार्यकार्यत्यांना होती. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे, मार्क्स, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे पाईक असल्याचा दावा करणारे महाराष्ट्रभरातील सत्यशोधक मार्क्सवादी या अमानुषतेबद्दल गप्प का? मौन धारण करून बसण्यासाठी त्यांना अशा कोणत्या परिस्थितीने बाध्य केले आहे? हा अत्यंत वेदनादायी प्रश्न आहे.
येवला येथून कल्याणला मुंबईकडे रहायला जाण्याच्या दिवशी म्हणजे २ एप्रिल २०२३ रोजी सरोज कांबळे यांनी मुलगा ईनायतच्या विरोधात अमानुष छळाची दोन पानी तक्रार लिहून ठेवली होती. कल्याणला येऊनही ईनायतने छळ केला तर ही तक्रार देऊन टाका, असा निरोप देऊन सरोज कांबळे कल्याणला गेल्या होत्या. पण तेथून त्या पुन्हा धुळ्यात आणल्या गेल्या आणि ५ जून रोजी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला.