अमानुषतेचा कळसः कबुतर चोरल्याच्या संशयावरून चार दलित तरूणांना झाडाला टांगून बेदम मारहाण, श्रीरामपूर तालुक्यातील घटना


श्रीरामपूरः कबुतर चोरल्याच्या संशयावरून सवर्ण व्यक्तींनी दलित तरूणांना विवस्त्र करून, झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील हारेगाव येथे शुक्रवारी घडली. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी सहा समाजकंटकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील हारेगाव येथील नाना गलांडे यांची शेळी आणि काही कबुतरे काही दिवासांपूर्वी चोरीला गेली होती. शोध घेऊनही शेळी आणि कबुतरे सापडली नसल्यामुळे नाना गलांडे आणि त्याच्या साथीदारांनी गावातील चार दलित तरूणांवर शेळी आणि कबुतरे चोरीचा आळ घेतला.

नाना गलांडे आणि त्याच्या साथीदारांनी शुक्रवारी सकाळी चार दलित तरूणांना त्यांच्या घरातून उचलून शेतात नेले. त्यांना विवस्त्र करून झाडाला उलटे टांगून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वेद्य, राजू बोरगे या सवर्ण समाजकंटकांनी चार दलित तरूणांना अमानुषपणे मारहाण केली.

 कबुतरे आणि शेळी चोरल्याच्या संशयावरून आपल्या पोरांना मारहाण करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडित तरूणाच्या आईने घटनास्थळी धाव घेतली. आपल्या मुलांना सोडून देण्याची विनंती पीडिताच्या आईने या समाजकंटकांना केली. मात्र या समाजकंटकांनी पीडित तरूणाच्या आईलाही शिविगाळ करत धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर या अमानुष अत्याचाराला वाचा फुटली.

या समाजकंटकांच्या मारहाणीत चारही दलित तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान, श्रीरामपूर पोलिसांनी या सहाही समाजकंटकांविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३६४, ३४२, ५०६, ५०४, १४३, १४९ आणि अनुसूचित जाती-जमातील अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, या समाजकंटकांना तत्काळ अटक करण्याची मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली आहे.

हारेगावात आज रास्तारोको आंदोलन: दलित तरूणांना झाडाला टांगून अमानुष मारहाण करणाऱ्या समाजकंटकांच्या तत्काळ मुसक्या आवळून त्यांना गजाआड करण्याच्या मागणीसाठी आज रविवारी हारेगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!