जळगावात भाजपला धक्काः विद्यमान खासदार उन्मेश पाटील उद्या करणार ठाकरे गटात प्रवेश, नाशिकचे गोडसेही टप्प्यात?


मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा दणका बसणार आहे. लोकसभा निवडणुकीचे तिकिट कापल्यामुळे नाराज झालेले विद्यमान भाजप खासदार उन्मेश पाटील हे उद्या बुधवारी दुपारी १२.३० वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेही ठाकरे गटाच्या टप्प्यात असल्याचे सांगितले जाते.

जळगावचे विद्यमान भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी काही वेळापूर्वीच मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे  नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यंदाच्या निवडणुकीत भाजपने उन्मेश पाटील यांचे तिकिट कापले आहे. त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना जळगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेले उन्मेश पाटील उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा आधीच सुरू झाली होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उन्मेश पाटलांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली. उद्या (३एप्रिल) १२.३० वाजता जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश होईल. खऱ्या शिवसेना परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत, असे अंधारे यांनी म्हटले आहे.

उन्मेश पाटील हे उद्या शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करत असले तरी जळगावमधून त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उन्मेश पाटील यांच्यासोबत पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार, अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी हेही शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसेंच्या सोबत आले नव्हते, तेवढे कार्यकर्ते भाजप सोडून ठाकरे गटात प्रवेश करतील, असे उन्मेश पाटील समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

नाशिकचे हेमंत गोडसेही टप्प्यात?

 नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला. त्यामुळे त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर न झाल्यामुळे ते नाराज आहेत. गोडसेंच्या उमेदवारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही विरोध केला.

 निवडणूक तोंडावर आली तरी महायुतीने नाशिकच्या जागेबाबत कोणताच निर्णय न घेतल्यामुळे या जागेचा तिढा कायम आहे. त्यामुळे नाराज हेमंत गोडसे शिंदे गट सोडून ठाकरे गटात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन दिवसांत त्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!