सिद्धार्थ महाविद्यालयाने परत केले माजी प्राचार्यांच्या वेतनाचे १० लाख ३० हजार रुपये, न्यूजटाऊनच्या दणक्यामुळे घश्यातली रक्कम बाहेर!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): जाफ्राबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाने अखेर दिवंगत माजी प्राचार्य डॉ. अशोक काकडे यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची ‘गिळलेली’ रक्कम त्यांच्या कुटुंबीयास देऊन टाकली. सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रशासनाने केलेल्या या हडेलहप्पीचा न्यूजटाऊनने पर्दाफाश केल्यानंतर विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी वेगाने सूत्रे फिरवली आणि गुरूवारी रात्री १० लाख ३० हजार ६८० रुपयांचा धनादेश प्राचार्य काकडे यांच्या पत्नी विद्या काकडे यांच्या स्वाधीन करण्यात आला.

जनार्दन म्हस्के संस्थापक अध्यक्ष असलेल्या सिल्लोड शिक्षण संस्थेचे जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथे सिद्धार्थ महाविद्यालय हे अनुदानित महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिवगंत प्राचार्य डॉ. अशोक आत्मराम काकडे यांची सातव्या वेतन आयोगानुसार जीपीएफ व महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम महाविद्यालयाच्या वेतन खात्यात जमा होऊनही त्यांच्या कायदेशीर वारसांना दिलीच नसल्याचे वृत्त न्यूजटाऊनने २२ सप्टेंबर रोजी प्रकाशित केले होते.

आवश्य वाचाः जाफ्राबादच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने दडपले प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमेचे १७ लाख ५९ हजार ७३१ रुपये!

विशेष म्हणजे डॉ.काकडे यांच्या निधनानंतर त्यांची अशी काही रक्कम येणे बाकी आहे, हे त्यांच्या कुटुंबीयास माहीतही नव्हते. सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रशासनाने नेमक्या याच संधीचा फायदा घेत वेतन खात्यात जमा झालेली रक्कम ‘गिळंकृत’ करून टाकली होती. डॉ. काकडे यांच्या कुटुंबीयास या रक्कमेबाबत थांगपत्ताही लागणार नाही, असा सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रशासनाचा ‘गोड गैरसमज’ होता.

हेही वाचाः न्यूजटाऊन इम्पॅक्टः जाफ्राबादच्या सिद्धार्थ महाविद्यालयातील आर्थिक हडेलहप्पीचा सहसंचालकांनी मागवला खुलासा, प्रशासक नेमण्याची तयारी?

न्यूजटाऊनने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रशासनाने ही गंभीर स्वरुपाच्या आर्थिक अनियमिततेवर पांघरूण घालण्याचा जोरकस प्रयत्न केला. परंतु छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी संवेदनशीलता दाखवत न्यूजटाऊनच्या वृत्ताची गंभीर दखल घेतली आणि या रकमा डॉ. काकडे यांच्या कायदेशीर वारसदारांना का वितरित केल्या नाहीत? याबाबतचा स्वयस्पष्ट खुलासा सादर करण्याचे आदेश महाविद्यालयाच्या प्रशासनाला दिले.

विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी ४ ऑक्टोबर रोजी हे आदेश जारी केल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाची पाचावर धारण बसली. डॉ. ठाकूर यांनी या प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालून काल गुरूवारी (५ ऑक्टोबर) वेतन पथकाचे अधीक्षक थोरेकार आणि लिपीक मोदे यांना जाफ्राबादला सिद्धार्थ महाविद्यालयात चौकशीसाठी पाठवले. विभागीय सहसंचालक कार्यालयाचे हे पथक चौकशीसाठी येताच सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रशासन घाबरून गेले आणि ‘गिळलेली’ ही रक्कम परत करण्यास तयार झाले.

हेही वाचाः जाफ्राबादच्या सिद्धार्थ कॉलेजकडून अल्पसंख्यांक दर्जाचा दुरूपयोग; फायदे लाटले पण बौद्ध अल्पसंख्यांकांच्या हित रक्षणाकडे हेतुतः दुर्लक्ष!

विभागीय सहसंचालक डॉ. ठाकूर यांच्या आदेशाने सिद्धार्थ महाविद्यालयात गेलेले हे दोघेजण प्राचार्य डॉ. काकडे यांच्या पत्नी विद्या काकडे यांच्या नावे १० लाख ३० हजार ६८० रुपयांचा धनादेश घेऊनच छत्रपती संभाजीनगरला परतले. या रकमेत सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम ९ लाख ८५ हजार ४७० रुपये आणि महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम ४५ हजार २० रुपयांचा समावेश आहे. त्यानंतर विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांच्या सूचनेनुसार गुरूवारी सायंकाळी विद्या काकडे यांना विभागीय सहसंचालक कार्यालयात बोलावून घेण्यात आले आणि डॉ. ठाकूर यांच्या हस्ते विद्या काकडे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

दिवंगत माजी प्राचार्य अशोक काकडे यांच्या पत्नी विद्या काकडे यांच्या पत्नी विद्या काकडे यांच्याकडून घेण्यात आलेली पोचपावती.

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रशासनाने केलेल्या या हडेलहप्पीचा न्यूजटाऊनने पर्दाफाश केल्यानंतर उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर आणि विभागीय सहसंचालक कार्यालयातील त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने हे प्रकरण हाताळले. त्यामुळे सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रशासनाने घश्यात घातलेली रक्कम बाहेर निघाली आणि दिवंगत माजी प्राचार्य डॉ. काकडे यांच्या कुटुंबीयास न्याय मिळू शकला! या प्रकरणात स्वाभिमानी मुप्टाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांनीही महत्वाची भूमिका बजावली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!