ठाकरे शिवसेनेची मशाल धगधगली: अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी, नोटाला प्रथम दुसऱ्या क्रमांकाची मते!


मुंबईः अंधेरी  पूर्वविधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे शिवसेनेला नवीन ऊर्जा मिळाली असून हा विजय पुढील काही महिन्यात होऊ घातलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी बुस्टर ठरणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. भाजपच्या विकृत राजकारणामुळे नोटाला एवढी मोठी मते मिळाली, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिवसेनेचे ४० आमदार सोबत नेल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय संघर्षात निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले.  शिवसेनेने मशाल हे नवीन निवडणूक चिन्ह देण्यात आले. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रातील नागरिकांची प्रचंड सहानुभूती असल्याचे अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या तब्बल ६६ हजार २४७ मते घेऊन या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक १२ हजार ७७८ मते मिळाली तर राजेश त्रिपाठी हे उमेदवार १ हजार ५६९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

 एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने मशाल या नवीन निवडणूक चिन्हावर ही निवडणूक जिंकून दाखवली आहे. अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने मशाल चिन्हावर मिळवलेला हा विजय उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा ठरला. मुंबईतील नागरिक भक्कमपणे शिवसेनेच्या मागे उभा आहे, हेच या निवडणूक निकालामुळे स्पष्ट झाले आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत या विजयाची शिदोरी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी  बुस्टर ठरणार आहे.

 मशाल भडकली, भगवा फडकला-ठाकरेः  कपट कारस्थानांनंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचे चिन्ह आणि नाव गोठवले. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे, याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचे श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचा आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

 हा शिवसैनिकांच्या जिद्दीचा विजय-आदित्य ठाकरेः आज अंधेरी पोटनिवडणुकीत जो विजय मिळाला आहे, तो दिवंगत रमेश लटके यांच्या कार्याचा, निष्ठेचा, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आणि शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा  आहे. या विजयातून निर्माण झालेल्या ऊर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल, याची खात्री आहे, अशी प्रतिक्रिया युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

 भाजपचे गलिच्छ राजकारणः अंधारे- अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेची आहे, हे मी पूर्वीच सांगितले आहे. दिवंगत रमेश लटके यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध केलेली ही जागा आहे. त्यामुळे ती जागा आम्ही जिंकणे फार स्वाभाविक आहे. मात्र भाजपने अत्यंत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला त्यांनी अर्ज दाखल केला आणि जेव्हा लक्षात आले आपण निवडणूक जिंकू शकत नाही, तेव्हा सुसंस्कृतपणा वगैरे कारणे देऊन माघार घेतली. परंतु आता नोटाला मिळालेली मते बघितली तर भाजप किती कपटनितीचे राजकारण करू शकतो याचा अंदाज येईल, असे शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

नोटाची मते हे भाजपच्या विकृतीचे दर्शन-सावंतः  ऋतुजा लटके यांच्या विजयाचा आनंद आहे. मात्र भाजप आणि मिंधे गटाने अखेरपर्यंत ऋतुजा लटके यांना त्रास दिला. त्यामुळे या निवडणुकीत नोटाला मिळालेली मते म्हणजे भाजप आणि मिंधे गटाच्या विकृतीचे दर्शन आहे. ही किती विकृत मनोवृत्तीची लोकं आहेत, हे आपल्याला पहाता येईल, असे  शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. पैसे देऊन नोटाला मतदान करा, असे सांगण्यात आले. त्याचे चक्क व्हिडीओ आहेत आणि त्यात पैसे देताना स्पष्ट दिसत आहे. आजपर्यंत देशात असे कधीच झाले नाही. हे फक्त भाजपचे कारस्थान आहे, असेही सावंत म्हणाले.

 भाजपने नोटाचा प्रचार केला- परबः या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्यानंतर आमच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि  मी देखील त्यांचे आभार मानले होते. पण या निवडणुकीत नोटाचा प्रचार केला गेला. माघार घेऊन लटकेंना पाठिंबा दिला असता तर काहीही अडचण नव्हती. त्यांनी माघार घेतली होती. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार केला. एकीकडे सहानुभूती आणि दुसरीकडे नोटाचा प्रचार अशी मोहीम भाजपने राबवली, असा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!