मुंबईः तव्यावरील भाकरी फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवायची वेळ आली असून आता विलंब करून चालणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यातून मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहे.
मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित युवा मंथन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शरद पवारांनी हे वक्तव्य केले आहे. समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. यासाठी वर्गवारी कशी करायची याचा विचार करायला हवा, असे पवार म्हणाले.
संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. ते काम पक्षात करण्याचा आग्रह सर्व वरिष्ठ नेत्यांकडे केला जाईल, असे पवार म्हणाले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की, यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरूणांमध्ये आहे, असेही शरद पवार म्हणाले.
आयुष्याच्या उमेदीच्या काळात अनेक गोष्टींची आपल्याला माहिती व संधी नसते. पण निर्धार पक्का असला तर आपण अडचणींवर निश्चित मात करू शकतो. त्यामुळे पक्षाला नेतृत्व तयार करण्यासाठी तरूणांपासून सुरुवात करावी लागेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी तरूणांनी विचारधारा आणि कष्ट या दोन गोष्टींचा आधार घेतला तर जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय ते थांबणार नाहीत, असे पवार म्हणाले.
मुंबईत कार्यकर्त्यांची कमी नाही. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलते आहे, पण येथील सामान्य कुटुंबे टिकली पाहिजे. गिरणी कामगारांची मुंबई आपण पाहिली आहे. तेव्हा कष्टकरी वर्ग मोठा होता. आज तो दिसत नाही. या ठिकाणी असलेल्या गिरण्या गेल्या आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या. गिरणीत काम करणारा कष्टकरी कुठे गेला माहीत नाही, असेही पवार म्हणाले.