धनंजय मुंडेंच्या कार्यालयात खंडणीसाठी तीन बैठका, वाल्मिक कराडकडून सहावेळा फोनवर धमक्या; ‘आवादा’च्या अधिकाऱ्याच्या जबाबात धक्कादायक खुलासे


बीडः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खात असलेला मास्टरमाइंड ‘आका’ वाल्मिक कराडशी असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असला तरी त्यांच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. धनंजय मुंडे यांचे विश्वासू निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी सहावेळा खंडणी मागितल्याचा तसेच आवादा कंपनीचा कर्मचारी शिवाजी थोपटे आणि वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांची धनंजय मुंडेंच्या जगमित्र शूगरच्या कार्यालयात खंडणीसाठी तीनवेळा बैठक झाल्याचा धक्कादायक खुलासा आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांच्या जबाबातून झाला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर सुरूवातीपासूनच विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मुंडेंचा अत्यंत विश्वासू निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच या हत्याप्रकरणाचा मास्टरमाइंड असल्यामुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी प्रारंभापासूनच लावून धरण्यात आली होती. परंतु संतोष देशमुख हत्याप्रकरणातील भयंकर छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. परंतु राजीनामा दिल्यानंतरही मुंडेंच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांनी पोलिसांकडे दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. वाल्मिक कराडने २८ ऑगस्ट २०२४ रोजी खंडणीची पहिली मागणी केली. परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा, अशी धमकी वाल्मिक कराडने दिली. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२४ रोजी कराडने पुन्हा फोन करून धमकी दिली. जिल्ह्यात तुमचे काम कुठे सुरू आहे, याची मला माहिती आहे. तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असे कराडने धमकावले, असे सुनिल शिंदे यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

८ ऑक्टोबर २०२४ रोजी वाल्मिक कराडने खंडणीची तिसऱ्यांदा मागणी केली. यावेळी विष्णू चाटे आणि आवादा कंपनीचा कर्मचारी शिवाजी थोपटे यांची धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात बैठक झाली. प्लांट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या, नाहीतर प्लांट सुरू ठेऊ देणार नाही, अशी धमकी विष्णू चाटेने शिवाजी थोपटे यांना दिली.

२६ नोव्हेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या कार्यालयात घुसून धमकी देत दोन कोटी रुपये दिले नाहीतर काम करू देणार नाही, असा इशारा दिला. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी वाल्मिक कराडने खंडणीसाठी पाचव्यांदा फोनवरून काम बंद पाडण्याची धमकी दिली आणि कर्मचाऱ्यांना निघून जाण्यासही धमकावले, असे सुनिल शिंदे यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुलेने आवादा कंपनीत घुसून कंपनीच्या सुरक्षारक्षकाला शिविगाळ करत मारहाण केली आणि शिवाजी थोपटे यांच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. दोन कोटी रुपये द्या नाहीतर कंपनी बंद करा, से सुदर्शन घुले वारंवार धमकावत होता. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले सरपंच संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका, असे सांगितले तेव्हा तुला बघून घेतो, जीवंत सोडणार नाही, अशी धमकीही सुदर्शन घुलेने दिल्याचे आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांनी जबाबात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!