नवी दिल्ली: काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत.
महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता भाजपकडून ३, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून १,अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून १ आणि काँग्रेसकडून १ उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. त्यासाठी काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
जून २०२३ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिली होती, मात्र काँग्रेसची मते फुटल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु हांडोरे यांनी पक्षावर विश्वास ठेवल्यामुळे काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
चंद्रकांच हांडोरे यांनी मुंबईतील चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात त्यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणूनही काम केले आहे. हांडोरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षही आहेत.
आता रायबरेली कोणाकडे?
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार असल्यामुळे आता त्यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या जागेसाठी प्रियंका गांधींचा विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.