भुवनेश्वरः आपल्या मागची साडेसाती दूर व्हावी म्हणून सात दिवसांपूर्वीच शनि शिंगणापूरला तब्बल एक कोटी रुपयांचा सोने-चांदीचा कलश अर्पण करणारे ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा किशोर दास यांच्यावर आज त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकानेच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झालेले नबा किशोर दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ओडिशाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नेते नबा किशोर दास हे आज सकाळी झरसुगुदा जिल्ह्यातील ब्रजराजनगर येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. ते ब्रजराजनगरातील गांधी चौकाजवळ पोहोचताच त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपाल दास यांनी त्यांच्यावर दोन राऊंड गोळ्या झाडल्या. नबा किशोर दास यांच्या छातीत डाव्या बाजूला गोळ्या लागल्या.
या गोळीबारात गंभीर जखमी झालेले नबा किशोर दास यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना एअर लिफ्ट करून भुवनेश्वरच्या अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ओडिशाचे मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांनी नबा किशोर दास यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपाल दास यांना मंत्री नबा किशोर दास यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. नबा किशोर दास हे गांधी चौकात गाडीतून उतरत असताना त्यांच्या गाडीजवळ जाऊन सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपाल दास यांनी गोळीबार केला. गोपाल दास यांनी नबा किशोर दास यांच्यावर गोळीबार का केला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र नबा किशोर दास यांच्यावरील या गोळीबारामुळे मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गोळीबाराच्या नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपाल दास यांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे, असे एसडीपीओ गुप्तेश्वर भोई यांनी सांगितले. गोपाल दास यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा गोळीबार केला? असे विचारले असता, याबाबत काहीही माहिती नसल्याचे भोई म्हणाले.
शनि आमावस्येला शनि शिंगणापूरला अर्पण केला होता सोन्याचा कलश
नबा किशोर दास यांनी सात दिवसांपूर्वीच म्हणजे शनि आमावस्येला (२२ जानेवारी) शनि शिंगणापूरला तब्बल एक कोटी रुपये खर्चून सोने-चांदीचा कलश अर्पण केला होता. एक किलो सातशे ग्रॅम सोने आणि पाच किलो चांदीचा उपयोग करून हा कलश तयार करण्यात आला आहे. शनि आमावस्येला सायंकाळी झालेल्या आरती सोहळ्यानंतर हा कलश विधीपूर्वक शनि मूर्तीसमोर अर्पण करण्यात आला होता. हा कलश अर्पण करून आठवडाही उलटला नाही तोच आज नबा किशोर दास यांच्यावर प्राणघातक संकट कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.