फडणवीसांचे अंत्यत विश्वासू आयपीएस अधिकारी ब्रजेश सिंह यांची मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी, प्रवीण परदेशी ‘मित्र’चे सीईओ!

मुंबईः भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आयपीएस अधिकारी ब्रजेश सिंह यांची मुख्यमंत्री कार्यालयात (सीएमओ) सचिवपदी तर माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) वर्णी लावण्यात आली आहे. फडणवीसांच्या अत्यंत विश्वासातल्या दोन अधिकाऱ्यांची सीएमओ आणि मित्रमध्ये नियुक्ती करण्यात आल्यामुळे मंत्रालयातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे.

सध्या गृहरक्षक दलाच्या अतिरिक्त महासंचालकपदावर कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी ब्रजेश सिंह यांची मुख्यमंत्री कार्यालयात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात ब्रजेश सिंह हे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक होते. आयपीएस अधिकाऱ्यांची नागरी खात्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा पायंडा फडणवीसांनीच मुख्यमंत्री असताना पाडला. आता तोच कित्ता पुन्हा गिरवण्यात आला असून आयपीएस असलेले ब्रजेश सिंह सीएमओमध्ये सचिव म्हणून आले आहेत.

ब्रजेश सिंह हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी समजले जातात. ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. शिंदे- फडणवीस सरकारने ब्रजेश सिंह या आयपीएस अधिकाऱ्याची आता थेट मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून बदली केल्यामुळे आयएएस अधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘मित्र’चे अध्यक्ष आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहअध्यक्ष आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकारने मित्रच्या उपाध्यक्षपदी ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय आशर आणि शिवसेनेचे माजी आमदार डॉ. राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती केली होती. आता मित्रच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आलेले प्रवीणसिंह परदेशी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय समजले जातात.

फडणवीस सरकारने २०१९मध्ये प्रवीणसिंह परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. परंतु महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सत्तेवर येताच मे २०२० मध्ये त्यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये परदेशी हे पुन्हा सक्रीय झालेले पहायला मिळतात. यापूर्वी फडणीस मुख्यमंत्री असताना परदेशी हे त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयात ब्रजेश सिंह यांची नियुक्ती झाल्यामुळे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत टीका केली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नेमणूक होण्याचा अर्थ काय बरं? अशी पृच्छा त्यांनी केली आहे. सावंतांच्या या ट्विटवर अनेकांनी खोचक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘याचा अर्थः कुणाच्या तरी संगणकात पुन्हा खोटे पुरावे अपलोड करणे’ अशी त्यातली एक प्रतिक्रिया आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!