राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची शरद पवारांची घोषणा; साहेब असे करू नका, पाया पडत कार्यकर्त्यांच्या विनवण्या


मुंबईः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा आज केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी एक समितीही सूचवली. ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हा मोठा निर्णय जाहीर करताच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या कार्यक्रमासाठी जमलेले कार्यकर्ते भावूक झाले. साहेब असे करू नका म्हणत कुणी हात जोडले, कुणी पाया पडत विनवण्या केल्या.

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पहात आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील तीन वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालण्यावर माझा भर असेल. याशिवाय मी कोणतीही जबाबदारी घेणार नाही, असे पवार म्हणाले.

माझ्या सहकाऱ्यांनो, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी सहा दशकांहून अधिक काळ जनमानसात काम करत आलो आहे. त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, मुंबई, बारामती, दिल्ली अथवा कुठेही असो, आपणा सर्वांसाठी मी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहन. जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहीन, असेही पवार म्हणाले.

गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने व आपण मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. परंतु यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठित करावी, असे मी सूचवू इच्छितो, असे शरद पवार म्हणाले.

 साहेब असे करू नकाः भावूक कार्यकर्त्यांची आर्जवे

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोक माझे सांगातीचा प्रकाशनसोहळा होता. याच सोहळ्यात पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून या समारंभासाठी आलेले कार्यकर्ते भावूक झाले. महाराष्ट्राचा बुलंद आवाज… शरद पवार… शरद पवार अशा घोषणांनी त्यांनी सभागृह दणाणून सोडले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. पवारांभोवती गर्दी करत कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली.

 अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना स्टेजवर जाऊन विनंती केली. आ. धनंजय मुंडे हे शरद पवारांच्या पाया पडले आणि पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची त्यांनी विनंती केली. त्यामुळे सभागृहात भावूक वातावरण निर्माण झाले. अंकुश काकडे, प्रकाश गजभिये यांनीही स्टेजवर जाऊन शरद पवारांचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मांडली.

 साहेबांसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आणि ज्वलंत आहेत. साहेबांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वांच्या भावनांचा विचार करता साहेबांनी या निर्णयाचा फेरविचार करावा आणि निर्णय घ्यावा, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तर शरद पवारांचा हा निर्णय ऐकून अश्रू अनावर झाले. शरद पवारांना परस्पर निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी लक्षात घ्याव्यात. त्यांच्या अनुभवाचा फायदा इथून पुढे सर्वांना व्हावा, असे जयंत पाटील म्हणाले.

 पवारांनी सूचवलेली समिती अशी

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड. नरहरी झिरवळ. इतर सदस्यः फौजिया खान (अध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस), धीरज शर्मा (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस), सोनिया दूहन (अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस).


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!