‘स्वतःला वाचवू शकत असाल तर वाचवा!’, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना खलिस्तानवादी दहशतवाद्याची धमकी


नांदेडः काही दिवसांपूर्वीच नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांना शौचालय साफ करायला लावल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गट शिवसेनेचे खासादार हेमंत पाटील यांना खलिस्तानवादी दहशतवाद्याने लंडनमधून फोनद्वारे धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. खा. पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली असून या धमकीनंतर खा. पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

खलिस्तानी दहशतवादी पन्नू याने लंडन येथून आंतरराष्ट्रीय मोबाईल फोन नंबरवरून आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणारा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचीही धमकी पन्नूने दिली असल्याचे खा. हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.

 स्वतःला वाचवू शकत असाल तर वाचवा, असे धमकी देणारा खलिस्तानी दहशतवादी पन्नूने म्हटल्याचे खा. पाटील यांनी म्हटले आहे. खलिस्तानी दहशतवादी पन्नूची धमकी मिळाल्यानंतर खा. पाटील यांनी २० डिसेंबर रोजी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. या घटनेनंतर २२ डिसेंबरपासून खा. पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांच्या घरासमोरील बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

खा. हेमंत पाटील यांना १४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास लंडन येथून आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरवरून कॉल आला. खलिस्तानी दहशतवादी पन्नू याने २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणारा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उधळून लावू, अशी धमकी त्याने दिल्याचे खा. पाटील यांचे म्हणणे आहे.

ही धमकी मिळाल्यानंतर खा. पाटील यांनी केंद्रीय गृह मंत्रालय, राष्ट्रपती, प्रधानमंत्री कार्यालय आणि राज्य सरकारकडेही याबाबत लेखी तक्रार केली आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पत्र लिहिले आहे.

या धमकीनंतर खा. हेमंत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या घरासमोरील बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!