नवी दिल्लीः विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (यूजीसी-नेट) राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांना १० मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने यूजीसी-नेटसाठी अर्ज करता येणार असून येत्या १६ जून रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) एका परिपत्रकाद्वारे यूजीसी-नेटचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. यूजीसी-नेट ही परीक्षा डिसेंबर आणि जून अशी वर्षातून दोनवेळा घेतली जाते. या परीक्षेत यूजीसीने जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेपासून काही महत्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार नेट परीक्षेद्वारे कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्तीसह सहायक प्राध्यापकपदासाठी पात्रता, सहायक प्राध्यापकपदासह पीएच.डी. प्रवेशासाठी पात्रता आणि केवळ पीएच.डी. प्रवेशासाठी पात्रता प्रवेश अशा तीन श्रेणींमध्ये पात्रता मिळणार आहे.
चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या, शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांनाही थेट पीएच.डी.ला प्रवेश घेण्यासाठीही यूजीसी-नेट परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे जूनमध्ये होणारी यूजीसी-नेट परीक्षा अधिक महत्वाची ठरणार आहे.
एनटीएच्या परिपत्रकानुसार, यूजीसी-नेट परीक्षेसाठी २० एप्रिल ते १० मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे ११ मे ते १२ मेपर्यंत रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख असेल. १३ मे १५ मेदरम्यान रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत ऑनलाईन अर्जातील तपशीलामध्ये दुरूस्त्या करता येतील. १६ जून रोजी यूजीसी-नेट परीक्षा घेतली जाईल.
ज्या शहरात परीक्षा घेतली जाणार आहे, अशा शहरांची यादी आणि एनटीएच्या वेबसाईटवरून परीक्षेची प्रवेशपत्रे कधी डाऊनलोड करता येतील, याची तपशील एनटीएकडून नंतर जाहीर केला जाणार आहे. परीक्षा केंद्राचा तपशील आणि कोणत्या शिफ्टमध्ये उमेदवाराची परीक्षा होणार आहे, याची माहिती उमेदवाराच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर दिला जाईल.
परीक्षेचे शुल्क किती?
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी यूजीसी-नेट परीक्षेचे परीक्षा शुल्क ११५० रुपये, ईडब्ल्यूएस/ओबीसी आणि एनसीएल प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये आणि एससी/एसटी/ तृतीय पंथीय आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ३२५ रुपये परीक्षा शुल्क असेल. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागेल. उमेदवारांनी https://ugcnet.nta.ac.in/ याच वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावेत. अन्य कोणत्याही मार्गाने केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका
१६ जून रोजी होणारी यूजीसी-नेट ही परीक्षा एकून ८३ विषयांत घेतली जाणार आहे. ही परीक्षा एक किंवा अधिक सत्रांमध्ये घेतली जाईल. तशी सूचना उमेदवारांना परीक्षेच्या प्रवेशपत्रावर दिली जाईल. परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. उमेदवारांना दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी तीन तासांचा अवधी दिला जाईल, असे एनटीएने या परिपत्रकात म्हटले आहे.