छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबर रोजी ‘विकसित भारत-२०४७’ या विषयावर देभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापकांना संबोधित करणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थी-प्राध्यापकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती केली आहे. या सक्तीवरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘विकसित भारत-२०४७’ या विषयावर देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-प्राध्यापकांना ऑनलाइन संबोधित करणार आहेत. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात खास व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाने ८ डिसेंबर रोजी एक परिपत्रक जारी करून या कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना उपस्थित राहणे सक्तीचे केले आहे.
अशाच प्रकारचा कार्यक्रम प्राचार्यांनी महाविद्यालयात आयोजित करून त्याचा अहवाल विद्यार्थी विकास मंडळाकडे सादर करावा, असे फर्मानही विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी सोडले आहे. या कार्यक्रमाची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विद्यापीठ प्रशासनाने मोदींच्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थी-प्राध्यापकांची उपस्थिती सक्तीची केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काही विद्यार्थी संघटनांनी या सक्तीच्या फर्मानावर आक्षेप घेतला आहे. ज्या विद्यार्थ्याची इच्छा नसेल त्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती कशासाठी? असा सवाल विद्यार्थी संघटना करत आहेत.
याबाबत विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक मुस्तजीब खान यांच्याशी संपर्क साधला असता विद्यार्थी-प्राध्यापकांना उपस्थिती अनिवार्य करण्याचे यूजीसी आणि कुलगुरूंचे आदेश आहेत, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना सक्ती कशासाठी? ज्याला ऐकायचे तो ऐकेल, नसेल ऐकायचे तर ऐकणार नाही? अशी विचारणा केली असता या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही, असे खान म्हणाले.
परीक्षा जवळ आलेल्या असल्यामुळे विद्यार्थी अभ्यासात गुंतलेला आहे. परीक्षेसाठी आवश्यक असलेले रिव्हिजन सोडून प्रधानमंत्र्यांच्या संवादाला हजर राहण्याची सक्ती कशासाठी? ज्याची इच्छा असेल तो विद्यार्थी ऐकेल आणि ज्याची इच्छा नसेल तो ऐकणार नाही. पण सक्ती करून मोदींचा संवाद ऐकायला भाग पाडणे हे लोकशाही धोक्यात आणून हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे, असे भारतीय विद्यार्थी सेनेचे तुकाराम सराफ यांनी म्हटले आहे.
मोदींसाठी परीक्षाच पुढे ढकलल्या?
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विधी, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नोव्हेंबर/डिसेंबरच्या १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नियोजित परीक्षा प्रशासकीय कारण देत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
या परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जातील, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र मोदींच्या विकसित भारत संवादासाठीच या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली आहे.