
मुंबईः मुंबईत ३४ मानवी बॉम्ब पेरण्यात आले असून ३४ गाड्यांमध्ये तब्बल ४०० किलो आरडीएक्स ठेवण्यात आले आहे. या ३४ मानवी बॉम्बच्या साह्याने एक कोटी लोकांना उडवून देऊ, अशी सनसनाटी धमकी मुंबई पोलिसांना फोनवरून देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर ही धमकी मिळाली आहे. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ही धमकी मिळाल्यामुळे पोलिस सतर्क झाले असून मुंबईतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मुंबईत नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सुरक्षेची चोख जबाबदारी बजावणारे मुंबई पोलिस गणेशोत्सवाच्या सुरक्षेत व्यस्त असताना आणि उद्याच्या (६ सप्टेंबर) गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच मुंबई पोलिसांना ही धमकी मिळाली आहे. मुंबई हादरवून सोडण्याची धमकी देणाऱ्या या व्यक्तीने लष्कर ए जिहादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले आहे. ही धमकी मिळाल्यानंतर पोलिस सतर्क झाले असून मुंबईतील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आलेल्या या धमकीच्या संदेशात ३४ पाकिस्तानी मानवी बॉम्ब मुंबई घुसले आहेत. ३४ गाड्यंमध्ये ३४ मानवी बॉम्ब वापरले जातील आणि ४०० किलो आरडीएक्सचा स्फोट घडवून एक कोटी लोकांना मारले जाईल, असा दावा करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हा धमकीचा संदेश आल्यानंतर मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षा अधिक कडक केली आहे. महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी हा धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हा धमकीचा संदेश गांभीर्याने घेतला असून सर्व पोलिस यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
