
नागपूर: राज्यातील विद्यापीठांमधील रखडलेल्या प्राध्यापक पदभरतीच्या प्रक्रियेस गती मिळाली असून गुणवत्तेच्या आधारे ६०:४० गुणसूत्रांआधारे भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. या नव्या फॉर्म्युल्यानुसार लवकरच ५ हजार १२ रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही पाटील म्हणाले.
विधानपरिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांनी प्राध्यापक पदभरतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.
राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून या पदभरतीची प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडली होती. राज्यपालांच्या अधिकार व सूचनांनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून गुणवत्तेच्या निकषांवर आधारित ६०:४० हे सूत्र निश्चित करण्यात आले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
६०:४० या सूत्रामध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, पीएच.डी., संशोधन लेख, अनुभव यावर आधारित गुणांकन करण्यात येणार आहे. तसेच मुलाखत समितीमार्फत आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून अध्यापन कौशल्याचे मूल्यमापन करण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे. यापूर्वी ८०:२० आणि ५०:५० अशा विविध प्रस्तावांवर चर्चा झाली होती; मात्र आता अंतिमतः ६०:४० हे प्रमाण लागू करण्याचा निर्णय झाला आहे, असेही पाटील म्हणाले.
प्राध्यापक भरतीतील ६०:४० गुणप्रणाली म्हणजे एकूण गुणांपैकी ६० टक्के गुण हे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अध्यापन अनुभव आणि संशोधनासाठी असतील. २० टक्के गुण हे मुलाखतीसाठी असतील आणि २० टक्के गुण हे उमेदवारांच्या अध्यापन कौशल्याच्या मूल्यमापनासाठी असतील, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
प्राध्यापकांच्या भरतीसाठी नव्या निर्णयाचा सविस्तर अभ्यास करून पुढील दोन-तीन दिवसांत कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी ५ हजार १२ पदे भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. आता नव्या फॉर्म्युल्यानुसार लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. ही पदे भरल्यानंतर उर्वरित पदे भरण्यात येतील, असेही पाटील म्हणाले.
