सिल्लोड शिक्षण संस्थेच्या राहुल म्हस्केंची ‘नालंदा’तील दुहेरी मान्यता अखेर रद्द, आता महाविद्यालयाच्या संलग्नीकरणावरच टाच?


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची दिशाभूल करून दोन स्वतंत्र महाविद्यालयांच्या आस्थापनांवर सहायक प्राध्यापक व प्रभारी प्राचार्यपदावर पूर्णवेळ मान्यता मिळवणारे सिल्लोड शिक्षण संस्थेचे राहुल म्हस्के यांना जोरदार झटका देत विद्यापीठ प्रशासनाने त्यांची मान्यता अखेर रद्द केली आहे. आता विद्यापीठाची दिशाभूल केल्याप्रकरणी या संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालयाचे संलग्नीकरणच रद्द केले जाण्याची शक्यता आहे. राहुल म्हस्केंच्या ‘चार सौ बीसी’चा न्यूजटाऊनने भंडाफोड केला होता.

‘थोर शिक्षण महर्षि’ जनार्दन म्हस्के यांनी स्थापन केलेल्या सिल्लोड शिक्षण संस्थेचे त्यांचे पुत्र राहुल म्हस्के हे सचिव आहेत. बौद्ध धार्मिक अल्पसंख्यांक शिक्षण संस्थेचा दर्जा मिळवल्यापासून या संस्थेने मनमानी करत अनेक घोटाळे करून ठेवले आहेत. सार्वजनिक विश्वस्त धर्मादाय संस्था म्हणून नोंदणीकृत असलेल्या आपल्याच संस्थेच्या सचिवपदावर कार्यरत असतानाही राहुल म्हस्के यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून संस्थेच्या जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात संगणकशास्त्र विषयाचे पूर्णवेळ सहायक प्राध्यापक आणि याच संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालयात पूर्णवेळ प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता मिळवली होती. राहुल म्हस्के यांच्या या ‘चार सौ बीसी’चा न्यूजटाऊनने  ४ मार्च रोजी केला होता.

हेही वाचाः विद्यापीठ प्रशासनाची दिशाभूल करून सिल्लोड शिक्षण संस्थेच्या राहुल म्हस्केंनी मिळवल्या दोन स्वतंत्र महाविद्यालयात पूर्णवेळ मान्यता!

सिल्लोड शिक्षण संस्था आणि त्या संस्थेचे सचिव राहुल म्हस्के यांनी केलेल्या या ‘चार सौ बीसी’चा भंडाफोड न्यूजटाऊनने केल्यानंतर विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली होती. विद्यापीठ प्रशासनाने न्यूजटाऊनच्या वृत्ताची दखल घेत त्याच दिवशी सिल्लोड शिक्षण संस्थेला नोटीस बजावून  सात दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. परंतु सिल्लोड शिक्षण संस्था आणि राहुल म्हस्के यांनी सात दिवसांच्या मुदतीत खुलासा न केल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सिल्लोड संस्थेला पुन्हा स्मरणपत्र बजावून खुलासा करण्यास आणखी सात दिवसांची मुदत दिली होती.

मांडवलीच्या ‘मगर’मिठीचे प्रयत्न निष्फळ!

विद्यापीठ प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीच्या उत्तरादाखल खुलासा करण्यासारखे कोणतेच ठोस कारण नसल्यामुळे सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जनार्दन म्हस्के आणि सचिव राहुल म्हस्के यांनी मांडवलीची ‘मगर’मिठी मारण्याचे प्रयत्नही करून पाहिले. पण त्यांची डाळ शिजली नाही.

हेही वाचाः एकच व्यक्ती दोन आस्थापनावर पूर्णवेळ प्राध्यापक कशी?, सिल्लोड शिक्षण संस्थेला विद्यापीठाची नोटीस; तातडीने खुलासा करण्याचे निर्देश

सिल्लोड शिक्षण संस्था किंवा राहुल म्हस्के यांनी समाधानकारक खुलासा न केल्यामुळे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या मान्यतेने शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी आज राहुल म्हस्के यांचे नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालयातील पूर्णवेळ सहायक प्राध्यापक आणि प्रभारी प्राचार्यपदाची मान्यता रद्द करण्यात आल्याचे आदेश जारी केले. विद्यापीठ प्रशासनाच्या या आदेशामुळे सिल्लोड शिक्षण संस्थेतील आणखी एक ‘चारसौ बीसी’ चव्हाट्यावर आली आहे.

आता ‘नालंदा’च्या संलग्नीकरणावरच टाच

सिल्लोड शिक्षण संस्थेच्या जाफ्राबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात २००४ मध्ये सुरू झालेल्या संगणकशास्त्र विभागात एम.एस्सी., एम.फिल. या शैक्षणिक अर्हतेच्या आधारे राहुल म्हस्के यांची पूर्णवेळ सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती दाखवण्यात आली होती. या नियुक्तीला विद्यापीठाने रितसर मान्यताही दिली होती. त्यानंतर या संस्थेने २०१२-१३ मध्ये छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालय सुरू केले.

जाफ्राबाद आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महाविद्यालये सिल्लोड शिक्षण संस्थेचीच असल्यामुळे संस्थेअंतर्गत बदली दाखवून राहुल म्हस्के यांनी नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता मिळवली असती तर त्याला कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नव्हते.

परंतु सिल्लोड शिक्षण संस्था आणि राहुल म्हस्के यांनी विद्यापीठ प्रशासन व शासनाची फसवणूक करण्यासाठी हेतुतः कट रचून जाफ्राबाद येथील महाविद्यालयातील नियुक्ती आणि मान्यता कायम ठेवली आणि दुसरीकडे नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालया १५ जून २०२० रोजी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकाची नियुक्ती दाखवून प्रभारी प्राचार्यपदावर विद्यापीठाकडून मान्यताही मिळवली.

सिल्लोड शिक्षण संस्था आणि राहुल म्हस्के यांनी विद्यापीठ प्रशासनाची हेतुतः दिशाभूल करून दोन स्वतंत्र महाविद्यालयात पूर्णवेळ मान्यता मिळवल्याचे न्यूजटाऊनने उघडकीस आणल्यामुळे संस्थेने जाणीवपूर्वक आपली आणि शासनाची फसवणूक आणि दिशाभूल केल्याची विद्यापीठ प्रशासनाची धारणा झाली आहे. त्यामुळे आता नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याचा कारवाई करण्यात येणार आहे.

यासंबंधी सिल्लोड शिक्षण संस्थेला नोटीस बजावून जाब विचारला जाईल आणि नंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे विद्यापीठातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. विद्यापीठ प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे यापुढे कोणताही संस्थाचालक विद्यापीठ प्रशासनाची दिशाभूल करायला धजावणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *