संतापः एकीकडे नव्या संसद भवनाचे उद्घाटन, दुसरीकडे तिरंग्याची शान वाढवणाऱ्या खेळाडूंवर दडपशाही करत आंदोलन चिरडले!


नवी दिल्लीः वेदमंत्रांच्या घोषात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत असतानाच दुसरीकडे या नव्या संसद भवनापासून काही किलोमीटर अंतरावरच असलेल्या जंतर-मंतरवर मैदानावर आंदोलन करणाऱ्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला खेळाडूंना पोलिसांनी अक्षरशः फरफटत ओढत नेऊन गाडीत कोंबले. त्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. राज्याभिषेक पूर्ण झाला, ‘अहंकारी राजा’ रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.

 दिल्लीमध्ये आज संसदेपासून ते सडकेपर्यंत लोकशाहीचा आवाज घुमत राहिला. नवीन संसद भवनात प्रधानमंत्री मोदी हे लोकशाहीवर भाषण झोडत होते तर दुसरीकडे रस्त्यावर महिला कुस्तीपटू आपला आवाज बुलंद करण्यासाठी संघर्ष करत होत्या. त्यांच्याशी जे वर्तन करण्यात आले, त्यावरून लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 सोशल मीडियावरही लोक तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. विरोधी पक्षांनी सुवर्ण पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना ज्या पद्धतीने पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याचा निषेध करत ही घटना अतिशय लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करणारे बृजभूषण सिंह यांना पदावरून हटवावे, या मागणीसाठी मागील महिनाभरापासून महिला कुस्तीपटूंनी जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असतानाच आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत हे खेळाडू जंतर-मंतरवरून कूच करत आज नव्या संसद भवनासमोर ‘महिला महापंचायत’ भरवणार होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी बळाचा वापर करून या खेळाडूंना ताब्यात घेतले.

 जंतर-मंतर मैदानावरून संसदेच्या दिशेने कूच करण्याच्या प्रयत्नात असलेले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह त्यांच्या अन्य साथीदारांना पोलिसांनी फरफटत नेत जबरदस्ती आपल्या वाहनात बवसले. एकीकडे खेळाडूंवर अटकेची कारवाई केली जात असतानाच दुसरीकडे आंदोलनस्थळावरील खेळाडूंच्या गाद्या, पंखे आणि इतर साहित्यही पोलिसांनी हटवले. त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसता येऊ नये, अशी व्यवस्था तर पोलिसांकडून केली जात नाही ना? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

 पोलिसांनी बळाचा वापर करून निर्दयपणे ज्या खेळाडूंनी फरफटत नेले, त्या साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार कामगिरी करत तिरंग्याची शान वाढवली आहे आणि प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलवली आहे. तिरंग्याची शान आणि देशाचा अभिमान वाढवणाऱ्या या खेळाडूंवर देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत असतानाच दडपशाही करण्यात आल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे.

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. राज्याभिषेक पूर्ण झाला आणि अहंकारी राजा जनतेचा आवाज रस्त्यावर चिरडत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आज जेव्हा प्रधानमंत्री नवी संसद भवनाचे उद्घाटन करत होते आणि लोकशाहीवर प्रवचन झोडत होते, तेव्हा संसदेपासून थोड्याच अंतरावर मेडल जिंकून देशाचा सन्मान वाढवणाऱ्या मुलींना या पद्धतीने ताब्यात घेतले जात होते. हे लज्जास्पद आहे आणि मोदी सरकारचा खरा चेहरा दाखवत आहे, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही खेळाडूंवरील कारवाईचा निषेध केला आहे. ‘देशाचा सन्मान वाढवणाऱ्या आपल्या खेळाडूंना दिलेली ही वागणूक खपच चुकीची आणि निषेधार्ह आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री मोदींनी ठोकले लोकशाहीवर लांबलचक भाषण

प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते आज नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबरोबरच लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या जवळच सेंगोल म्हणजेच राजदंड स्थापित करण्यात आला आहे. प्रधानमंत्र्यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणाऱ्या एका पट्टिकेचेही अनावरण केले आणि या संसद भवनाचे बांधकाम करणाऱ्या श्रमिकांना सन्मानित केले. केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, एस. जयशंकर आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी लोकशाहीवर लांबलचक भाषण दिले. भारत केवळ एक लोकशाही राष्ट्र नसून लोकशाहीची जननीही आहे. भारत आज जागतिक लोकशाहीचाही एक मोठा आधार आहे. आमच्यासाठी लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही, तर एक संस्कार आहे, एक विचार आहे, एक परंपरा आहे, असे मोदी म्हणाले.

आमची लोकशाही हीच आमची प्रेरणा आहे. आमचे संविधान हाच आमचा संकल्प आहे. ही प्रेरणा, या संकल्पाची सर्वात श्रेष्ठ प्रतिनिधी म्हणजे आमची ही संसद आहे, असे प्रधानमंत्री मोदी यांनी या भाषणात सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!