मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला ३१ मेपर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा!


मुंबईः राज्यात ऐन उन्हाळ्यात राज्याच्या बहुतांश भागाला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाच आता पुन्हा एकदा ३१ मेपर्यंत मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामानात वारंवार होत असलेल्या बदलामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह अन्य काही राज्यातही अवकाळी पावसाने मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा मात्र अद्यापही कायम आहेत. मुंबई, कोकण किनारुपट्टी भागात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी न झाल्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ४८ तासांत पुन्हा एकदा हवामानात बदल झालेले पहायला मिळणार असून त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

मराठवाडा, विदर्भात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर पहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा कमी होऊन हवेतील गारवा वाढून असह्य उकाड्यापासून नागरिकांची थोडीफार सुटका होईल.

सध्या मान्सूनची वाटचाल सकारात्मक मार्गाने सुरू असून कोणताही अडथळा न आल्यास बंगालच्या उपसागरातून तो वेगाने पुढे सकरण्याची शक्यता आहे. एकीकडे देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावासने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूरसह काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि गारपीटीमुळे या जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत शेतकऱ्यांनी शेतीमालाची काळजी घ्यावी, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

देशातील राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यात सध्या चक्रवातसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम देशातील अनेक राज्यांत पहायला मिळत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!