पुणेः छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबतच्या भूमिकेवर मी ठाम आहे. मी केलेले विधान कोणाला द्रोह वाटत असेल तर त्यांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता शुक्रवारी दिले आहे. माझी प्रत्येक भूमिका सर्वांना पटेलच असे नाही. परंतु माझी भूमिका चुकीची ठरवणारे हे कोण? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. त्यांना स्वराज्यरक्षक म्हणणेच योग्य आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केले होते. त्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलनही केले होते. शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी आपल्या भूमिकेचा पुनरूच्चार केला आहे.
संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह आहे, असे भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा पुनरूच्चार करतानाच द्रोह असेल तर गुन्हा दाखल करा, असे आव्हानच देऊन टाकले आहे.
मी कोणता गुन्हा केला?: मी माफी मागावी अशी मागणी होत आहे. मात्र मी कोणता गुन्हा केला आहे? अपशब्दही वापरलेले नाहीत. राज्यपाल, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी बेताल वक्तव्ये केली, अपशब्द वापरले. जे शब्द वापरायला नको होते ते शब्द सत्ताधाऱ्यांनी वापरले, असे अजित पवार म्हणाले. जीवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आम्ही द्रोह करणार नाही. आमच्याकडून तसे घडणार नाही, असेही पवार म्हणाले.
मला चूक ठरवणारे तुम्ही कोण?: मी माझ्या भूमिकेवर ठाम असतो. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. विचार स्वातंत्र्य आहे. मी जी भूमिका मांडली ती सर्वांना पटेलच असे नाही. मात्र माझी भूमिका चुकीची ठरवणारे तुम्ही कोण?, असा सवालही अजित पवारांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच स्वाभिमानातून झाली आहे. आम्ही पहिल्यापासूनच पुरोगामी विचार मानणारे आहोत. महापुरूष आणि वडिलधाऱ्यांनी जी शिस्त घालून दिली, विचारांचा जो पगडा आहे, त्याला धक्का न लागता पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.