‘पोरां’मुळे मास्तरांचीही गोचीः विद्यापीठातील प्राध्यापकांनाही बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य!


औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागप्रमुख व प्राध्यापकांना त्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे अनिवार्य करण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. कुलगुरूंच्या या निर्णयामुळे विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांना शिस्त लागले, अशी अपेक्षा आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना यापूर्वीच बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भात विद्यापीठाच्या अस्थापना विभागाने ९ जानेवारी रोजी परिपत्रक क्र.४०/२०२२-२३ जारी केले आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांना त्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे सुरु करण्यात येत असून सर्वांनी आपली उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवरच नोंदवावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

विद्यापीठातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यांच्या रजांचे नियमनही करण्यात आले आहे. या सर्वांना त्यांच्या रजा या विद्यापीठाने अंमलबजावणी केलेल्या ऑनलाईन लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारेच विभागप्रमुखांमार्फत सादर कराव्यात. रजा सक्षम अधिका-यांनी मंजूर केल्याशिवाय रजेवर जाऊ नये व रजेवर जातांना वरिष्ठांनी आदेशित केलेले अधिकारी/कर्मचारी यांना आपला कार्यभार सुपूर्द करुनच रजेवर जावे. रजेवर लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकींग सिस्टीम द्वारे रुजू अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकींग सिस्टीमचा यूजर आयडी/पासवर्ड उपलब्ध नसेल त्यांनी युनिक विभागाशी संपर्क साधून तो प्राप्त करुन घ्यावा. संबंधित विभागप्रमुखांनी लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकिंग सिस्टीम मधील नोंदीबाबतचा अहवाल प्रमाणित करुन आस्थापना विभागास रुजू झाल्यानंतर ३ दिवसात सादर करावा, असे कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी कळविले आहे.

कर्मचाऱ्यांचे रजेचे अर्जही ऑनलाईनः विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन १ जानेवारीपासून बायोमेट्रीक उपस्थितीशी पडताळणी करण्यात येऊन अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली किरकोळ रजा, अर्जित रजा, वैद्यकीय रजा, लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकिंग सिस्टीम द्वारे सादर कराव्यात. गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या किरकोळ रजा, अर्जित रजा, वैद्यकीय रजा लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे सादर करण्यास विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी मदत करावी. याबाबत विभागप्रमुख त्यांची उपरोक्त रजा पुढील कार्यवाहीस्तव अग्रेषित करु शकतात, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

प्राध्यापकांच्या बायोमेट्रिक हजेरी संदर्भात आज परिपत्रक जारी करण्यात आले आहे. संशोधक विद्यार्थी, कर्मचारी तसेच प्राध्यापकांच्या बायोमेट्रिक हजेरीसंदर्भात कोणतेही कॉम्प्रमाईज करणार नाही.

– डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

 अर्जित रजा, वैद्यकीय रजा लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकिग सिस्टीमद्वारे रुजू अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. ज्या शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम/ फाईल ट्रॅकिंग सिस्टीमचा यूजर आयडी/पासवर्ड उपलब्ध नसेल त्यांनी युनिक विभागाशी संपर्क साधून तो प्राप्त करुन घ्यावा. लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीममधील नोंदीबाबतचा अहवाल प्रमाणित करुन विभागप्रमुखांनी आस्थापना विभागास रुजू झाल्यानंतर ३ दिवसात सादर करावा. शिक्षकेत्तर अधिकारी- कर्मचा-यांचे मासिक वेतन बायोमेट्रीक उपस्थितीशी जोडणी करण्यात येणार असल्यामुळे विभागप्रमुखांनी बायोमेट्रिक उपस्थिती अहवाल विनाविलंब प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत प्रमाणित करुन देणे आवश्यक आवश्यक आहे.

सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुखांनी हे परिपत्रक आपल्या अधिनस्थ शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर त्यांनी स्वाक्षरी घ्यावी, असे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी कळवले आहे.

पोरांमुळे मास्तरांचीही अडचण

  पूर्णवेळ संशोधन करणाऱ्या पीएच.डी.च्या संशोधक छात्रांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. या निर्णयाला संशोधक छात्रांनी विरोध केला होता. प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य नाही, मग आम्हालाच का? अशी या संशोधक छात्रांची तक्रार होती. आज संशोधक छात्रांचे शिष्टमंडळ कुलगुरू डॉ. येवलेंना भेटले आणि त्यांनी पहिल्यांदाच तक्रारींचा पाढा वाचला. बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केल्यानंतरच तुम्ही तक्रारी करता, याआधी या समस्या नव्हत्या का? होत्या तर मग तक्रार का नाही केली? या कुलगुरूंच्या प्रश्नांवर संशोधक छात्रांची बोलती बंद झाली. लगेच कुलगुरूंनी पोरांबरोबरच त्यांच्या मास्तरांनाही बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आणि तसे परिपत्रक कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी जारी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!