एम.फील. अर्हताधारक अध्यापकांनाही ‘कॅस’चे लाभ!,  चंद्रकांत पाटलांनी दिले निर्देश

मुंबई:  ११ जुलै २००९पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे  मार्गदर्शन मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

एम. फील. अर्हताधारक अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य एम. फिल. पात्रताधारक प्राध्यापक संघर्ष समितीने पाटील यांना निवेदन दिले होते. त्यासंदर्भात आज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालय मुंबई येथे बैठक झाली.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) ५ सप्टेंबर २०२२ रोजीच्या पत्रानुसार, अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी पुढाकार घेऊन नोव्हेंबर २०२२ मध्ये सकारात्मक भूमिका घेत विभागाला आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बहुतांश एम.फील. पदवीधारक अध्यापकांना लाभ देण्यात आले. मात्र काही मागण्या विचाराधीन होत्या. त्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, महाराष्ट्र राज्य एम.फील. पात्रताधारक प्राध्यापक संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. नीलेंद्र लोखंडे, डॉ. सचिन गोसावी, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. सविता तायडे, डॉ. लता चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर बोराडे, डॉ. अभिजित पवार व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!