औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्रतिविद्यापीठ गेटचे बांधकाम आज अखेर जमीनदोस्त करण्यात आले. नामांतर चळवळीचे प्रेरणास्त्रोत बनलेल्या मुख्य गेटचे महत्व कमी करण्यासाठीच विद्यापीठ प्रशासनाने नवीन गेटचे बांधण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करत आंबेडकरी चळवळीने एकजुटीने या नवीन गेटच्या बांधकामाला विरोध केला होता. अखेर आंबेडकरी चळवळीच्या एकजुटीसमोर नमते घेत विद्यापीठ प्रशासनाने हे बांधकाम आज जमीनदोस्त करून टाकले. न्यूजटाऊनने या गेटच्या विरोधात आक्रमकपणे मोहीम राबवली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे काम विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीच अगदी दहा-पंधरा फुटांच्या अंतरावर ‘इन-आऊट गेट’च्या नावाखाली नवीन गेट बांधण्यात येत होते.
विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार हे नामांतर चळवळीचे प्रतिक तसेच आंबेडकरी जनतेची अस्मिता आणि प्रेरणास्रोत आहे. त्यामुळे या मुख्य प्रवेशद्वाराचे महत्व कमी करण्यासाठीच विद्यापीठ प्रशासनाकडून नवीन प्रवेशद्वार बांधण्यात येत आहे, असा आंबेडकरी नेते आणि कार्यकर्त्यांचा आक्षेप होता. आंबेडकरी जनतेच्या भावना आणि हे सर्व आक्षेप धुडकावून काही बांडगुळांना हाताशी धरून विद्यापीठ प्रशासन या नवीन गेटचे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न करत होते.
विशेष म्हणजे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ आंबेडकरी नेत्यांनी यापूर्वीच या नवीन प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच त्याला विरोध केला होता. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाला आमचा विरोध नाही, परंतु सुशोभीकरणाच्या नावाखाली नवीन गेट बांधण्याचे कटकारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन दिला होता. तरीही बांधकाम पुढे रेटण्यात येत होते.
७ डिसेंबर रोजी आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन तुम्ही हे नवीन गेट पाडणार नसाल तर आम्ही बुलडोजर लावून पाडून टाकू, असा सज्जड इशारा दिला होता. तेव्हा कुलगुरूंनी तीन दिवसांत हे गेट जमीनदोस्त करण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार आज सुशोभीकरणाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने आज जेसीबीच्या साह्याने नवीन गेटचे बांधकाम जमीनदोस्त केले. विद्यापीठ प्रशासनाची ही कारवाई आंबेडकरी जनतेच्या एकजुटीचा विजय मानण्यात येत असून निहीत स्वार्थासाठी आंबेडकरी चळवळ कुणाच्या दावणीला बांधणाऱ्या मूठभर बांडगुळांना ही मोठी चपराक ठरली आहे.
कंत्राटदारापुढे आता ‘वसुली’चा प्रश्न
या नवीन गेटच्या बांधकामाला आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते कडाडून विरोध करत असतानाच काही जणांनी या नव्या गेटला पाठिंबा देणारे निवेदन देऊन हे बांधकाम पुढे रेटण्यास विद्यापीठ प्रशासनाला प्रोत्साहन दिले होते. त्यासाठी त्यांना संबंधित कंत्राटदाराकडून ‘नजराणा’ देण्यात आला होता, असे सांगण्यात येते. पोलिस प्रोटेक्शन लावून हे बांधकाम करा, असा सल्ला देणाऱ्या या ‘नजराणा’बहाद्दरांनी दिला होता. परंतु आंबेडकरी चळवळीच्या एकजुटीपुढे हे नवे गेट पाडून टाकण्याची वेळ आल्यामुळे बांधकाम होऊ देण्यासाठी दिलेला ‘नजराणा’ आता वसूल कसा करायचा? असा प्रश्न कंत्राटदाराला सतावत असल्याचे सांगण्यात येते.