राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या ‘बारामती ऍग्रो’ कंपनीवर मध्यरात्री २ वाजता कारवाई, ७२ तासांत प्लांट बंद करण्याचे फर्मान


बारामतीः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीच्या बारामती येथील प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री दोन वाजता कारवाई केली. आ. रोहित पवार यांना याबाबतची नोटीस रात्री २ वाजता देण्यात आली असून या नोटिशीत ७२ तासांत प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आ. रोहित पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

‘दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे २ वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करताना, भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते, ही मराठी माणसाची खासियत आहे,’ अशा शब्दांत आ. रोहित पवार यांनी या कारवाईमुळे आपण जराही डगमगलो नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जुलै महिन्यात सहभागी झाले. तेव्हापासून आ. रोहित पवार हे शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. अशातच आ. रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र रोहित पवार यांनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचा निर्धार ट्विट करून बोलून दाखवला आहे.

‘हा लढा मी लढणारच आहे. परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे, त्यांना एकच सांगायचे आहे की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो. परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचे राजकारण आजच्या पिढीला पटणारेही नाही,’ अशा शब्दांत आ. रोहित पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.

आ. रोहित पवार यांचा २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्यांच्या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. यावरूनही आ. रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातील युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे,’ असेही आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.

‘सर्वसामान्यांच्या कामला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील,’ असेही आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!