राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरु, मराठवाड्यात २६ टक्के तर विदर्भात ६१ टक्के पावसाची तूट


मुंबई: अठरा दिवसांच्या विश्रांतीनंतर १६ जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या २४ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तुलनेत पूर्वविदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.

१ ते १६ जूनदरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या २२ टक्के अधिक पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा एक टक्का कमी, मराठवाड्यात २६ टक्के कमी, आणि विदर्भात ६१ टक्के कमी पाऊस झाला. राज्यातील १३४ तालुक्यांत एकूण ६५ मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला आहे आणि ८४ तालुक्यांत सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस झाला. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांत पावसाची घट लक्षणीय आहे.

२२ जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांत २२ तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही.

अद्यापि ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!