
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी येत्या मंगळवारी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जयंत पाटलांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या आधीपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून निघाल्यानंतरही शरद पवार यांनी जयंत पाटलांवरच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.
शरद पवार यांचे अनेक वर्षांपासूनचे निष्ठावंत सहकारी म्हणून जयंत पाटलांची ओळख आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण केल्यामुळे नव्या चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी देण्यात यावी, अशी मागणी पक्षातीलच काही नेत्यांकडून करण्यात येत होती. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर येथे झालेल्या विजयी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) मंचावरून आ. रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे ही मागणी केली होती.
विधानसभा निवडणूक होईपर्यंत माझ्या पदाचे दिवस मोजत बसू नका, त्यानंतर मी स्वतःच जबाबदारीतून मुक्त होईल, असे जयंत पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते. असे असले तरी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत तरी त्यांना प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवले जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात होती. परंतु स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार किंवा जयंत पाटील यांनी या राजीनाम्याबाबत अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र मंगळवारी बोलावण्यात आलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. शशिकांत शिंदे हेही एक अनुभवी आमदार असून ग्रामीण भागावर त्यांची मजबूत पकड आहे.
