मंत्री संजय शिरसाटांच्या बेडरूममध्ये ‘पैशांनी भरलेली बॅग आणि हातात सिगारेट’, संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे खळबळ


मुंबईः छत्रपती संभाजीनगरातील व्हिट्स हॉटेल लिलाव प्रकरणी प्राप्तिकर विभागाने नोटीस बजावल्याचे उघडकीस आल्याच्या दुसऱ्याच दिवशी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मंत्री संजय शिरसाट हे बेडरूममध्ये बसलेले दिसत आहेत. त्यांच्या बाजूला एक बॅग पडलेली दिसत आहे आणि या बॅगेत नोटांचे बंडल्स दिसत आहेत. मंत्री शिरसाट हे बेडरूममध्ये बनियनवर बसलेले आहेत आणि सिगारेट ओढत ओढत कुणाशी तरी फोनवर बोलत आहेत. या व्हिडीओत संजय शिरसाट यांचा पाळीव श्वान देखील दिसत आहे. दरम्यान, संजय शिरसाट यांनी या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरणही दिले आहे.

शिरसाट यांच्या बाजूला पैशांनी भरलेल्या बॅगा असल्याचा दावा करत संजय राऊत म्हणाले की, प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीनंतर संजय शिरसाटांचा हा व्हिडीओ माझ्याकडे आला आहे. ‘मंत्री संजय शिरसाट हे एका हॉटेलमधील खोलीत बेडवर बसलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला नोटांच्या बंडलांनी भरलेल्या बॅगा दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरसाटांवर कारवाई करणार का?,’ असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री कार्यालयाला टॅग करत ‘देशात काय चाललंल?’  असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

‘हा रोमांचक व्हिडीओ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी पहायला हवा. देशात काय चाललंय हे त्यांनी पहावं. महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा हा व्हिडीओ खूप काही सांगून जातो. हा व्हिडीओ पाहून मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दया येते. स्वतःच्या अब्रुचे किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस!’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पहा व्हिडीओः

स्पष्टीकरण देत शिरसाट म्हणाले…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले आहे. ‘तो व्हिडीओ माझ्या बेडरूममधीलच आहे. मी प्रवास करून आल्यावर बेडवर बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. बेडशेजारी आमचा लाडका श्वानही आहे. प्रवासातून आल्यानंतर माझी कपड्यांची अडकवलेली बॅग दिसते, त्याची बातमी होते, याचं मला आश्चर्य वाटते,’ असे संजय शिरसाट म्हणाले.

‘माझ्याकडे मातोश्री व मातोश्री-२ नाही. माझे घर माझ्या मतदारसंघातील प्रत्येकासाठी उघडे असते. कार्यकर्ते येतात, उत्साहाच्या भरात कोणीतरी व्हिडीओ काढला असेल. माझ्या घरात चिठ्ठी देऊन कोणालाही बोलावले जात नाही. काम काय, नाव काय अशा गोष्टी विचारल्या जात नाहीत,’ असेही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

अंजली दमानियांचे खुले आव्हान

संजय शिरसाटांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही एक ट्विट करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘मला संजय शिरसाटांची कमाल वाटते. बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना ते पैसे नाहीत, कपडे असतील असे ते म्हणूच कसे शकतात?  मी त्या व्हिडीओला झूम करून फोटो काढला आहे,’ असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

‘हा माझ्या घरचा व्हिडीओ आहे, असे ते म्हणत आहेत… त्यांच्यात हिम्मत असेल आणि ते खरे बोलत असतील तर आजच्य आज त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना नेऊन दाखवावे, की जी बेडरूम व्हिडीओमध्ये दिसत आहे ती खरेच त्यांच्या घरची आहे,’ असे आव्हान देतानाच ‘मला यात फक्त एक गोष्ट चुकीची वाटते की कोणाच्याही बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावणे अतिशय चुकीचे आहे,’ असेही दमानिया यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!