
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत एम. ए. हिंदी पाठ्यक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षेचे सर्वच्या सर्व पेपर बेकायदेशीरपणे दुसऱ्याकडूनच लिहून घेतल्या प्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खानला खुलताबाद पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे अशा ‘चारसौ बीसी’ प्रकरणात मझहर खानला झालेली नजीकच्या काळातील ही तिसरी अटक आहे.
खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठाचे अभ्यास केंद्र आहे. आपल्याच महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रात कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान, संस्थेची सचिव आणि त्याची पत्नी आस्मा खान या दोघांनी एम. ए. हिंदी पाठ्यक्रमाला प्रवेश घेतला. यंदाच्या जानेवारी महिन्यात १६ ते २१ तारखेला कोहिनूर महाविद्यालयातच परीक्षा घेण्यात आल्या.
डॉ. मझहर खान आणि आस्मा खान यांनी या परीक्षेत एकही पेपर स्वतः न लिहिता आपल्याच महाविद्यालयातील कर्मचारी फिरोज शेख व बाळू भोपळे यांच्यावर दबाव टाकून सोडवून घेऊन मुक्त विद्यापीठाची फसवणूक केल्याची तक्रार रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे केली होती. त्या तक्रारीच्या आधारे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी प्रकुलगुरू डॉ. जागेंद्रसिंह बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशीत डॉ. मझहर खान आणि आस्मा खान यांनी चारसौ बीसी केल्याचे निष्पन्न झाले.
चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुक्त विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय केंद्राचे सहायक कक्ष अधिकारी सतीश बोरसे यांनी ६ जून रोजी मझहर खान, आस्मा खान आणि त्यांना परीक्षेत गैरप्रकार करण्यास मदत करणारे फिरोज गफार शेख, बाळू भगवान भोपळे, शेख बादशहा, शेख लईक मेहमूद यांच्याविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बोरसे यांच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलिसांनी या सहाजणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२), ३(५) आणि महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियमाच्या कलम ३ व ५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात खुलताबाद पोलिसांनी तब्बल १२ दिवसांनी म्हणजेच मंगळवारी (१७ जून) हर्सूल तुरूंगातून ताब्यात घेत अटक केली. अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उद्या शुक्रवारपर्यंत मझहर खान पोलिस कोठडीत राहणार ईहे. या प्रकरणी खुलताबादचे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे हे तपास करत असून अन्य पाच आरोपींनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात डॉ. मझहर खानला झालेली ही तिसरी अटक आहे. यापूर्वी मझहर खान व आस्मा खानला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या बनावट पदव्यांच्या आधारे पेट परीक्षेत सूट मिळवून पीएच.डी. ला प्रवेश मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेेडकर मराठवाडा विद्यापीठाची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी बीएचएमएसची बनावट पदवी तयार केल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती.

