मुंबईः मान्सूनच्या माघारीचा प्रवास सध्या सुरू असून पुढील चार दिवसात राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे दसऱ्याच्या आनंदावर पावसाचे विरजन पडण्याची शक्यता आहे.
काहीशा अडथळ्यानंतर मान्सूनच्या माघारीला पुन्हा सुरूवात झाली आहे. पूर्वेकडे वाहणारे वारे सध्या सक्रीय झाले आहेत. त्यामुळे राज्यात आर्द्रता, किमान व कमाल तापमानात वाढ होत आहे. याचा परिणाम ऋतूचक्रावर होऊन पावसाचे ढग दाटून येऊ लागले आहेत. राज्याच्या अनेक भागात पाऊस होत आहे. पुढील चार दिवसही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून या भागात पुढील चार दिवस मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने राज्यातील २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला. मुंबईची पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दसऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचे राजकीय दसरा मेळावे आयोजित करण्यात येतात. यंदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर दसरा मेळावा आयोजित केला आहे. या दसरा मेळाव्यांची जय्यत तयारी सुरू असतानाच हवामान विभागाने ११ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबरदरम्यान राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे या दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट घोंगावू लागले आहे.
देशातील पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कच्छ, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भाग आणि गुजरातमधून मान्सून परतला असून अद्याप महाराष्ट्रातून त्याचा परतीचा प्रवास सुरू झालेला नाही. राज्यातील परतीच्या पावसाचे चित्र १५ तारखेपर्यंत स्पष्ट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.