HSC Result-2025: इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल उद्या ५ मे रोजी, यावेळी गुणपत्रिका कुठे व कशी मिळणार? वाचा सविस्तर तपशील


पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (एचएससी) म्हणजेच इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल उद्या ५ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाने याबाबतची आज अधिकृत घोषणा केली.

इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना ५ मे रोजी दुपारी १ वाजेनंतर बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. तसेच त्यांच्या गुणपत्रिका डिजिलॉकरमध्ये (Digilocker) मध्ये उपलब्ध असतील. निकाल जाहीर झाल्यानंतर इच्छूक विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज करता येतील, असे बोर्डाने म्हटले आहे.

इयत्ता १२ वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी यंदा बोर्डाने मेच्या पहिल्याच आठवड्यात १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे ठरवले आहे.

नेहमीप्रमाणे इयत्ता १२ वीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याऐवजी यंदा ११ फेब्रुवारीपासूनच परीक्षा घेण्यात आल्या. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेला १५ लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते.

 कुठे पहायचा निकाल?

इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाने अधिकृत संकेतस्थळे जाहीर केली आहेत. त्यानुसार खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना ५ मे रोजी दुपारी १ वाजेनंतर त्यांचे निकाल पाहता येतील. ती संकेतस्थळे अशीः

विद्यार्थ्यांना या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका https://www.digilocker.gov.in/ येथे उपलब्ध करून देण्यात येणार असून येथे लॉग-इन करून त्यांना उत्तरपत्रिकेची प्रिंटआऊट काढता येईल  तर महाविद्यालयांना एकत्रित निकाल https://www.mahahsscboard.in/  या संकेतस्थळावर त्यांच्या लाग-इनमध्ये पाहता येईल.

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाची सुविधा

 इयत्ता १२ वीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ६ मे ते २० मे २०२५ या कालावधीत स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळांकडे ऑनलाइन पद्धतीने बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येतील. अर्ज करताना डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/ यूपीआय/ नेट बँकिंगद्वारे शुल्काचा भरणा करावा लागेल.

 पुनर्मूल्यांकनासाठी यंदा ‘ही’ अट

  • ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करावयाचे आहे, त्यांच्यासाठी बोर्डाने यंदा एक अट घातली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या म्हणजेच इयत्ता १२ वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
  • उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यातील अर्ज आणि विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. म्हणजेच उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती मिळाल्याशिवाय पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार नाही.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!