मुंबईः राज्यात निवडणुका कधी जाहीर होतील, तेव्हा आम्ही एकत्र येऊ. निवडणुका ताबडतोब जाहीर झाल्या तर ताबडतोब एकत्र येऊ, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीचे स्पष्ट संकेत दिले. प्रकाश आंबेडकर यांच्या या संकेतांमुळे आगामी काळात राज्याचे राजकीय चित्रच पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईत प्रबोधनकार डॉट कॉम या प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर आधारित संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल रविवारी एकाच मंचावर होते. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हे मोठे विधान केले आहे.
महाराष्ट्राचे सध्याचे सरकार हे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशावर सुरू आहे. न्यायालयाने स्थगितीच्या आदेशावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी आमची न्यायालयाला विनंती आहे. कारण हे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, असे मी मानत नाही. राहिला प्रश्न आम्ही एकत्र येण्याचा…. तर राज्यात निवडणुका कधी लागू होणार? यावर ते अवलंबून आहे. ताबडतोब निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही ताबडतोब एकत्र येऊ. नंतर निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही नंतर एकत्र येऊ, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तत्पूर्वी या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे कौतुक करतानाच त्यांच्याशी युतीचे संकेत दिले. देशात लोकशाही टिकवण्यासाठी, स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी केवळ लोकांना जागे करून चालणार नाही तर यासाठी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साद घातली.
आज देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहे. त्यांनी चेहऱ्यावर बुरखा लावलेला आहे. स्वतःचा चेहरा दाखवला तर लोक जवळ येणार नाहीत. त्यामुळे मुखवटा घालायचा, मते मिळवायची आणि राज्य करायचे असे सुरू आहे. तोडा-फोडा आणि राज्य करा, अशी इंग्रजांची नीती देशात राबवली जात आहे. देश गुलामगिरीकडे चालला असताना आपण नुसते बघत राहणार असू तर आपल्याला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही पहिल्यांदा जरी एकत्र आलो असलो तरी आमचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे, असेही ठाकरे म्हणाले.
प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथरूपातील विचार जो वाचेल त्याला आजच्या परिस्थितीत सामाजिक, राजकीय आणि धार्मिक धक्काही बसेल. देशातील हजारो वर्षांची गुलामगिरी प्रबोधनकारांनी तीन वाक्यात नमूद केली. मनुस्मृतीच्या व्यवस्थेला प्रबोधनकारांनी दोष दिला होता. राजेशाहीच्या विरोधात लढणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव क्षत्रिय होते, असे यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले.
या देशात वैदिक परंपरा की संताची परंपरा असे द्वंद आहे. आम्ही कुठे पाहिजे, याबाबत प्रबोधनकारांनी आसूड ओढले. धर्म हा आवश्यक आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या तिघांचे भांडण धर्माशी नव्हते. तर त्या धर्मांनी उभ्या केलेल्या समाजव्यवस्थेशी होते. त्यात सुधारणा करणारी मांडणी प्रबोधनकारांनी केली. समता, बंधुभाव या दोन्हींचा बळी जाता कामा नये, अशी त्यांची मांडणी होती, असेही आंबेडकर म्हणाले. सध्याची लढाई धर्माची नाही तर लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे. आता आपल्याला ठरवायचे आहे की आपण कोणत्या बाजूने आहोत. प्रत्येक मतदाराने हे ठरवायला हवे की आपण लोकशाहीच्या बाजूने आहोत की हुकुमशाहीच्या, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.