औरंगाबादः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना शिवसेनेत उभी पाडून एकनाथ शिंदे ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत गेले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या गटातील आमदारांचा उल्लेख शिंदे गट असा केला जातो. मात्र असा उल्लेख राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना मान्य नाही. आम्ही शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करत असलो तरी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत, असे उदय सामंत म्हणाले.
मसिआच्या वतीने औरंगाबादेतील ऑरिक सिटीत आयोजित करण्यात आलेल्या ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ या औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आज सामंत आले होते. त्यावेळी त्यांनी ही खंत बोलून दाखवली.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या गटातील आमदारांचा उल्लेख शिंदे गट असा उल्लेख केला जातो. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत असलो तरी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत. निवडणूक आयोगाने आम्हाला त्या नावाने मान्यता दिली आहे, असे सामंत म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीबरोबरच अन्य मनोरंजन उद्योग उत्तर प्रदेशात नेण्यासाठीच ते मुंबईत आल्याची टीका केली जात आहे. त्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी टिकास्त्र सोडले होते. महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टी राज्याबाहेर जाईल अशी भीती व्यक्त करत त्यांनी टीका केली होती. मात्र अशा टीका ते नेहमीच करतात. महिलांबाबत बोलणारे, आमचे मुडदे पाडू असे बोलणाऱ्या राऊत यांच्यबाबत काय बोलावे? पुढील पंचवीस वर्षे ते असेच बोलत राहावेत, हीच सदिच्छा, असे म्हणत सामंतांनी संजय राऊतांवर टीका केली.
औद्योगिक प्रदर्शन सुरूः मसिआतर्फे शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील ऑरिक सिटीत आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार होते. परंतु मुंबई विमानतळावर त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. तासभर प्रयत्न करूनही विमानातील तांत्रिक बिघाड दुरूस्त न झाल्यामुळे या दोघांचा औरंगाबाद दौरा रद्द करण्यात आला.
विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द करण्यात आला असला तरी शेवटच्या दिवशी ते येऊ शकतात अशी शक्यता उदय सामंत यांनी व्यक्त केली. या उद्घाटनाला पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे आदींची उपस्थिती होती.