लंडनः ब्रिटनमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली असून ब्रिटनच्या प्रधानमंत्रा लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांतच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रधानमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता पुढील आठवड्यात नव्या प्रधानमंत्र्यांची निवड केली जाणार आहे.
मागील काही दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये अन्नधान्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे येथील महागाई गेल्या ४० वर्षांतील उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात झालेली दरवाढ ही १९८० नंतरची सर्वात मोठी दरवाढ ठरली होती.
आर्थिक आणि राजकीय संकट असलेल्या लिझ ट्रस सरकारसमोर महागाई नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान होते. लिझ ट्रस यांनी प्रधानमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ब्रिटनमधील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काही धोरणात्मक पावले उचलली होती. मात्र ब्रिटनचे नेतृत्त्व स्वीकारल्यानंतर त्यांनी केवळ सहा आठवड्यांतच पक्षाचा विश्वास गमावल्यामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे.
कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून माझी नेता म्हणून निवड झाली होती. मात्र मी दिलेली आश्वासने पूर्ण शकले नाही. मी माझ्या पक्षाचा विश्वास गमावला आहे. याच कारणामुळे मी राजीनामा देत आहे. पुढील आठवड्यात नव्या नेतृत्त्वाची निवड केली जाईल. देशाची आर्थिक स्थिरता आणि राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
लिझ ट्रस, ब्रिटनच्या मावळत्या प्रधानमंत्री
लिझ ट्रस यांनी महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी राबवलेल्या धोरणांचा फटका येथील बाजाराला बसला. लिझ ट्रस सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले होते. याच दरम्यान लिझ ट्रस यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षात फूट पडली आणि त्यांनी पक्षाचा विश्वास गमावला. त्याची परिणती त्यांच्या राजीनाम्यात झाली आहे.