१५ वर्षीय विद्यार्थ्याचे ३२ वर्षीय विवाहितेकडून लैंगिक शोषण, व्यसनीही बनवले; वाचा धक्कादायक कहाणी…


ठाणेः नाशिकमधील एका ३२ वर्षीय विवाहितेने एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचे तब्बल चार वर्षांपासून लैंगिक शोषण करून त्याला दारू आणि अश्लील व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात त्या विवाहित महिलेविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ वर्षीय पीडित विद्यार्थी कल्याणमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो. त्याचे वडील कल्याण- डोंबिवली महापालिकेत नोकरी करतात. पीडित विद्यार्थ्याची आई गृहिणी आहे. घरात बहिणी आणि आजी आहे. पीडित विद्यार्थ्याची आत्या नाशिक येथे कुटुंबासह राहते. तेथे घराशेजारीच राहणारी तिची एक मानलेली मुलगी आहे. ती ३२ वर्षांची आहे. तिला दोन मुलेही आहेत.

 पीडित विद्यार्थ्याची आत्या नाशिकहून आईला पाहण्यासाठी कल्याणला आली की तिच्यासोबत तिची मानलेली ३२ वर्षाची विवाहित मुलगीही सोबत येत होते. त्यामुळे पीडित विद्यार्थी आणि त्या ३२ वर्षीय विवाहित महिलेची ओळख झाली. ही ओळख वाढत गेली. त्यातून त्या ३२ वर्षीय महिलेने या १५ वर्षीय विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर पीडित विद्यार्थी आत्याकडे नाशिकला नेहमीच जाऊ लागला. तीन-तीन महिने राहू लागला. ही ३२ वर्षीय विवाहिताही वारंवार कल्याणला येऊ लागली. ती कल्याणला आली की पीडित विद्यार्थ्याला घेऊन फिरायला जात असे.

२०१९ पासून हा प्रकार सुरू होता. इयत्ता नववीमध्ये शिकणारा हा पीडित विद्यार्थी वारंवार शाळेला दांडी मारून नाशिकला जाऊन राहू लागला. त्याला विरोध केला की तो आईवडिलांवर रागावू लागला. रागाच्या भरात तो नाशिकला निघून जाऊ लागला.

संभाषणासाठी घेऊन दिला २० हजारांचा मोबाईलः या विवाहित महिलेने पीडित विद्यार्थ्याच्या कायम संपर्कात राहण्यासाठी त्याला २० हजार रुपयांचा मोबाईल फोन घेऊन दिला. या मोबाईलवर त्याला अश्लील चित्रफिती पाहण्याची सवयही तिनेच पीडित विद्यार्थ्याला लावली. पीडित विद्यार्थ्याच्या आईने मोबाईलबाबत विचारणा केली असता त्याने नाशिकच्या या ३२ वर्षीय महिलेने घेऊन दिल्याचे सांगितले. त्यामुळे  त्याच्या आईचा संशय बळावला.

…अशी दिली कबुलीः संशय बळावल्याने आईने पीडित विद्यार्थ्याच्या खासगी शिकवणीतील शिक्षकाला त्याला विश्वासात घेऊन चौकशी करण्यास सांगितले. तेव्हा त्याने धक्कादायक कबुली दिली. आपले नाशिक येथील ३२ वर्षीय महिलेशी शारीरिक संबंध आहेत, आपणास अश्लील व्हिडीओ पाहण्याची सवय तिनेच लावल्याचे त्याने सांगितले. आपण दारू पितो. दारूसाठी पैसे जमवण्यासाठी आपण खानावळीत काम करतो, असेही या मुलाने सांगितले.

मोबाईल काढून घेतला की करायचा चिडचिडः मोबाईलवर कायम चिकटून राहणाऱ्या या पीडित विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी त्याचे मोबाईलचे व्यसन थांबवण्यासाठी त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला की तो आजी आणि आईच्या मोबाईलवरून त्या महिलेशी संपर्क साधायचा. मोबाईल काढून घेतला की तो चिडचिड करायचा आणि रागात नाशिक येथे त्या महिलेच्या घरी निघून जात होता.

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे दाखवले. परंतु त्यामुळे काहीच फरक पडला नाही. मुलगा व्यसनी बनून वाया चालल्याचे पाहून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला भिवंडी येथील सुधारगृहात भरती केले. सरकारच्या बालहक्क सुधार विभागाकडून या पीडित विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात येऊ लागले आहे.

नाशिकच्या नंणदेच्या मानलेल्या या ३२ वर्षीय मुलीमुळे आपल्या मुलाचे आयुष्य उद्धवस्त झाले. त्याला विविध व्यसने लावून त्याला वाया घालवले, अशी खात्री पटल्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या आईने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात या ३२ वर्षीय विवाहितेविरुद्ध तक्रार दिली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी नाशिकच्या या महिलेविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!