
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पुणे जिल्हयातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडबली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालवले जात असल्याबाबतच्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्या आसपासच्या परिसरात अशा प्रकारच्या अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हयातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ यावर संपर्क साधून बालकांवरील शारिरीक तसेच लैंगिक अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
पुणे जिल्हयातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडबली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालवले जात असल्याबाबतच्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. वृत्तपत्रातप्रकाशित झालेल्या बातम्यानुसार तसेच सदर संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ मधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ मधील कलम ४२ नुसार मान्यता तथा सोबतच्या नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालवणाऱ्या व्यक्तीला १ वर्ष कारावास तसेच १ लाख रुपयांपेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्यात येईल अशी तरतूद आहे, असे नयना गुंडे यांनी म्हटले आहे. अशा अनधिकृत संस्था आपल्या परिसरात असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ यावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
